शेतकरी म्हणताहेत, प्रतापराव दिघावकर आमच्यासाठी सिंघम ! - Farmers says, DIG Pratap Dighavkar is Singham For Us | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी म्हणताहेत, प्रतापराव दिघावकर आमच्यासाठी सिंघम !

सुभाष पुरकर
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नाशिकला नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी विविध शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुडालेले पैसे मिळवून दिले. एकट्या वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या परिसरात तेवीस शेतकऱ्यांना त्यांचे बुडालेले  ५५ लाख रुपये मिळवून दिले.

वडनेर भैरव : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची नाशिकला नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी विविध शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुडालेले पैसे मिळवून दिले. एकट्या वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या परिसरात तेवीस शेतकऱ्यांना त्यांचे बुडालेले  ५५ लाख रुपये मिळवून दिले. नकार देणाऱ्या बारा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे कोरोना असला तरीही यंदाची दिवाळी संकटातील या  शेतकऱ्यांना आनंदाची जाणार आहे. 

यासंदर्भात ज्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, त्यांच्याकडून तीन लाखांची वसुली करण्यात यश आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पोलिस महानिरीक्षक दिघावकर हे आमच्यासाठी `सिंघम` आहेत, अशी प्रतिक्रीया व्यक्त करतांना दिसले. 

श्री. दिघावकर यांची नाशिकला नियुक्ती झाल्यावर त्यांनी द्राक्ष, डाळींब, भाजीपाला आदी पीके खरेदी करुन पैसे न देताच शेतकरी, नागिरकांची पशवणूक केलेल्यांविरोधात विशेष मोहिम उघडण्याचे आदेश त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. थेट वरिष्ठांनीच आदेश दिल्याने सर्व यंत्रणा सक्रीय झाली. आजवर प्रलंबीत असलेल्या गुन्ह्यांच्या फाईलवरील धुळ झटकण्यात आली. त्यातून तक्रारदारांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला. 

शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन त्यांना पैसे न देता, त्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्याप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मालेगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष तयार केला. मनमाड पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाण्यात ३३ शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलूावून व्यापाऱ्याकडून त्यांचे सुमारे ५५.६९ लाख रुपये शेतकऱ्यांना परत करण्यात आले. ज्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला अशा व्यापाऱ्यांविरोधात बारा गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील सहा व्यापाऱ्यांना अटक करण्यात आले आहे.  गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांकडून तीन लाख रुपये शेतकऱ्यांना परत करण्यात आले. यातील काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे.

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व लहरी निसर्ग यामुळे बळीराजा संकटात सापडला असताना पोलिसांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यामुळे तो सुखावला आहे. या कारवाईने पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. शेतकरी वर्गात समाधान आहे.  अशी मोहीम पोलिसांनी राज्यभर सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
...
द्राक्ष बागांचे व्यवहार बांधावर आणि शेतकरी व व्यापारी यांच्या विश्वासावर होतात. लॉकडाऊनच्या आधी आम्ही व्यापाऱ्यांना द्राक्षे दिली होती. मात्र पैसे मिळत नव्हते. श्री. दिघावकर यांच्या प्रयत्नामुळे पैसे मिळाले.

- अविनाश खिराडकर, शेतकरी.
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख