बांध कोरण्याच्या युगात रमेश गवळींनी धरणासाठी दिली दहा एकर जमीन - Farmer Ramesh Gavali giv ten acre land to Irrigation Dam | Politics Marathi News - Sarkarnama

बांध कोरण्याच्या युगात रमेश गवळींनी धरणासाठी दिली दहा एकर जमीन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

रमेश गवळी या शेतक-याने बंधारा बांधण्यासाठी स्वतःची दहा एकर जमीन शासनाला दिली. त्यांच्या योगदानाचे कौतुक करीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. गवळी यांना पाण्याचे महत्व समजले, असे त्यांनी सांगितले. 

नाशिक : हल्ली बांधावरची भांडणे, अतिक्रमण अन् इंच इंच बांध कोरण्याचा जमाना आहे. अशा काळात रमेश गवळी या शेतक-याने बंधारा बांधण्यासाठी स्वतःची दहा एकर जमीन शासनाला दिली. त्यांच्या योगदानाचे कौतुक करीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. गवळी यांना पाण्याचे महत्व समजले, असे त्यांनी सांगितले. 

सध्या शेतकरी व भावकीतील बांधावरचे वाद, अतिक्रमण आणि इंच इंच बांध कोरून अतिक्रमण करणे सामान्य बाब झाली आहे. एक इंचभर देखील जमीन सोडण्याची किंवा इतरांची आपल्याकडे असेल तर ती परत जाऊ नये यासाठी नित्य वाद होता. सर्वाधिक खटले याच विषयावरचे असतात. मात्र अशा स्थितीत देखील रमेश सीताराम गवळी हा शेतकरी प्रकल्पासाठी पुढे आला. त्याने आपली दहा एकर जमीन बंधारा बांधण्यासाठी देऊन गावापुढे एक आदर्श निर्माण केला. 

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री  जयंत पाटील यांनी मंगळवारी सुरगाणा तालुक्यात भेट देऊन वळण बंधारे योजनांचा आढावा घेतला. यावेळी पाण्याचे महत्व येथील स्थानिक शेतकऱ्यांना समजले असल्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी स्वमालकीच्या जमिनी बंधारा बांधणीसाठी देवून मोठे योगदान दिले. ज्या शेतकऱ्यांनी  स्वत:च्या जमिनी  पाणी  बंधाऱ्यासाठी  दिल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन करून जमिनीचा योग्य मोबदला त्यांना दिला जाईल, असेही जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी बंधारा प्रकल्पासाठी स्वत:ची दहा एकर जमीन शासनास उपलब्ध करून देणारे शेतकरी रमेश गवळी यांचा सत्कार जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी केला. 

श्री पाटील म्हणाले, सुरगाणा तालुका हा विक्रमी पर्जन्यवृष्टीचा प्रदेश आहे. 'पाणी आडवा व पाणी जिरवा' या भूमिकेतून प्रथम येथील स्थानिकांची पाण्याची गरज प्राधान्याने पूर्ण करून सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागाच्या  विकासासाठी लघुपाटबंधारे व प्रवाही वळण योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करणार आहे. हा तालुका हे सर्वाधिक पर्जन्यलाभ क्षेत्र असूनही येथील पाणी वाहून जाऊन पश्चिमेकडील समुद्रास  मिळते. त्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागतो. या ठिकाणी लघु पाटबंधारे सारख्या योजना केल्या तर स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न तर सुटेलच त्यासोबत पाण्याची उपलब्धता होऊन नळपाणी पुरवठा सारख्या योजना सुध्दा या भागात सुरू करता येतील. 

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार सुनील भुसारा, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, जलसंपदा विभागाचे सचिव तथा कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक टी. एन. मुंढे, मुख्य अभियंता अनंत मोरे, मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, विजय घोगरे, कार्यकरी अभियंता योगेश सोनवणे, तहसीलदार पंकज पवार, नायब तहसिलदार सुरेश बकरे, गट विकास अधिकारी रत्नाकर पगार  आदी उपस्थित होते.
....
 

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख