Ex MP devidas Pingle phone call | Sarkarnama

माजी खासदार देवीदास पिंगळे यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते, माजी खासदार व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना मोबाईलवरून ठार करण्याची धमकी देणा-या अल्पवयीन युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिक : राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते, माजी खासदार व नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना मोबाईलवरून ठार करण्याची धमकी देणा-या अल्पवयीन युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या धमकीबाबत श्री. पिंगळे यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या प्रकरणाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गंभीर दखल गेतली होती. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलिस अधिका-यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. श्री. पिंगळे नुकतेच बाजार समितीचे सभापती झाले. यावेळी बाजार समितीच्या अंतर्गत राजकारणातून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून सातत्याने त्यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे या धमकीविषयी पोलिसांनी व श्री. पिंगळे यांच्या समर्तकांनी गांभिर्याने घेतले आहे. बाजार समिती संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यात, या घटनेचा निषेध करण्यात आला.

माजी खासदार पिंगळे यांची बाजार समितीच्या सभापतिपदी निवड झाली आहे. बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर येथील जागेत शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार आहे. या जागेची पाहणी आणि कार्यक्रमाची तयारी बघण्यासाठी सभापती पिंगळे दोन दिवसांपूर्वी सायंकाळी संचालकांसह त्र्यंबकेश्वरला गेले होते. जागेची पाहणी करून रात्री साडेनऊच्या सुमारास धोंडेगाव व गिरणारे या रस्त्याने परत येत असताना, त्यांच्या मोबाईलवर हा फोन आला. फोनवर संबंधीत व्यक्तीने त्यांना ठार करण्याची धमकी देऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.  त्यानंतर त्याने फोन कट केला. पिंगळे यांनी त्या क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. श्री. पिंगळे यांच्या कार्यालयातून ट्रू कॅालर द्वारे त्या नंबरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, देवळाली गाव येथील वाबळे असे नाव त्यावर येत होते. मात्र संपर्क झाला नाही.

दरम्यान याबाबत पोलिसांच्या सायबर शाखेने त्या क्रमांकाचा शोध घेऊन धमकी देणा-यास ताब्यात घेतले. त्याचा तपास केला असता, तो देवळालीगाव येथील अल्पवयीन मुलगा असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्या आई वडिलांनाही विचारपूस करण्यासाठी संपर्क केला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलास कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली. तसेच या धमकीमागे नेमके कोण आहे, याचा तपास सुरु आहे. 
...
मोबाईलवरून मला ठार करण्याची धमकी आणि अर्वाच्य शब्द वापरून शिवीगाळ करण्यात आली. त्यास काहीही प्रत्युत्तर दिले नाही. या धमकीची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. - देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख