खडसे म्हणाले, राज्यातील बारा, तेरा माजी आमदार संपर्कात  - Eknath Khadse says 12-13 Ex MLA in my contact | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे म्हणाले, राज्यातील बारा, तेरा माजी आमदार संपर्कात 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

राज्यातील भाजपचे १२ ते १३ माजी आमदार माझ्या संपर्कात असून, ते राष्ट्रवादीत येण्याच्या स्थितीत आहेत. त्यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षात प्रवेश केलेले नेते, एकनाथ खडसे यांनी सांगितले. 
 

धुळे : राज्यातील भाजपचे १२ ते १३ माजी आमदार माझ्या संपर्कात असून, ते राष्ट्रवादीत येण्याच्या स्थितीत आहेत. त्यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षात प्रवेश केलेले नेते, एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर श्री. खडसे शनिवारी कारने धुळेमार्गे जळगावला रवाना झाले. त्यांचा सायंकाळी पुरमेपाडा (ता.धुळे) सीमेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुनील नेरकर व अन्य पदाधिका-यांनी सत्कार केला. या स्वागतासह खडसे यांना ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी अक्षरशः गराडा घातला होता. 

राष्ट्रवादीतील माझा पहिला दिवस आहे, असे सांगत खडसे यांनी नमूद केले, की पक्षाच्या धुळे जिल्हाध्यक्षांशी बोलून जुन्या, नव्या नाराज कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी ते कार्यकर्ते माहीत करून घ्यावे लागतील. सध्या तरी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक माझ्या संपर्कात नाहीत. त्यांनी दूरध्वनीद्वारे माझ्या पक्षप्रवेशाबाबत अभिनंदन केले; 

यावेळी खडसे म्हणाले, खासदार डॉ. हीना गावित, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मीच भाजपमध्ये आणले होते. तसेच शिवसेनेतून खासदार डॉ. सुभाष भामरे यांना भाजपमध्ये आणले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीत असणाऱ्यांना पुन्हा या पक्षात आणण्याचा माझा प्रयत्न असेल. शहाद्याचे (जि. नंदुरबार) नगराध्यक्षच नव्हे, तर अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचे श्री. खडसे यांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार अनिल गोटे यांच्या साथीने ओबीसी चळवळीला गती देण्याचा, या घटकाला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल.

दरेकर यांचे अभिनंदन 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्कार स्वीकारण्यापेक्षा खडसे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची समस्या जाणावी, अशी टीका केल्याचा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यावर मला त्यातील काही कळत नाही, पण दरेकर यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ पाहून, त्यांना शेतीतील अधिक कळत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, अशी खोचक टीका श्री. खडसे यांनी केली.  

यावेळी राजेंद्र चितोडकर, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्ष रणजित भोसले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत काटे, महेंद्र शिरसाठ आदी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. 

 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख