"राष्ट्रवादी' प्रवेशाच्या चर्चेने सिडकोत एकनाथ खडसे गट सक्रीय?  - Eknath Khadse joines NCP roumers will affect BJP In CIDCO? | Politics Marathi News - Sarkarnama

"राष्ट्रवादी' प्रवेशाच्या चर्चेने सिडकोत एकनाथ खडसे गट सक्रीय? 

प्रमोद दंडगव्हाळ
रविवार, 27 सप्टेंबर 2020

भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात नाराज आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर खानदेशी नागरिकांचा वरचष्मा असलेल्या शहरातील सिडको भागातील किती पदाधिकारी गळाला लागतील, याची चर्चा जोरात आहे.

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षात नाराज आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर खानदेशी नागरिकांचा वरचष्मा असलेल्या शहरातील सिडको भागातील कोणते व किती पदाधिकारी त्यांच्या गळाला लागतील, याची चर्चा जोरात आहे. यासंदर्भात कोणीही उघड प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. मात्र स्थानिक राजकारणात कोंडी झालेल्यांना ही राजकीय उभारीची संधी ठरण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून खान्देश पट्ट्यातील अन्‌ राज्यातील भाजपचे मोठे नेते अशी ओळख असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले. यासंदर्भात अनौपचारीक चर्चा व तयारीही झाल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने जळगाव जिल्ह्यातील राजकारणावर खडसेंच्या राजकीय निर्णयाचा परिणाम होईल. तसाच जळगावशी संलग्न असलेल्या नाशिकच्या राजकारणावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. विशेषतः नाशिक शहरातील सिडको विभागात सध्या भाजपचा वरचष्मा आहे. येथील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते खडसेंच्या गळाला लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. अशा राजकीय चर्चांना सध्या सिडको भागात उधाण आले आहे. मात्र याबाबत व्यक्तीगत स्तरावर कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. 

सिडको परिसर हा खानदेश बहुल आहे. या भागात बहुतांशी नागरिक हे धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे महापालिका, विधानसभा असो वा लोकसभा कोणत्याही निवडणूकीत येथे प्रचारसभा घेताना जळगावच्या नेत्यांना आवर्जून आणि आग्रहाचे आमंत्रण दिले जाते. हे नेते देखील न चुकता सभांना हजेरी लावतात. भाषण खानदेशी बोली भाषेचा प्रपचारात उपयोग करतात. घरोघर देखील अहिराणी भाषेतील प्रचार होतो. या नेत्याचे अस्सल अहिराणी भाषण ऐकण्यासाठी नागरिकही तेव्हढ्यात उत्साहाने जमतात. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा विचार करतांना व्विवध राजकीय पक्ष स्थानिकांपेक्षा खान्देश पट्ट्यातील नेत्यांना अधिक प्राधान्य देतात. नुकतेच सहा महिन्यापूर्वी सिडकोतील महापालिका पोटनिवडणुकीत सभा घेण्यासाठी खास जळगावच्या बड्या नेत्याला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या एका सभेने तो उमेदवार निवडून आल्याचे सांगण्यात येते. यावरून या भागात खानदेशी नेत्यांचा किती प्रभाव आहे, हे दिसून येते. 

सध्या सिडको परिसरात भाजपच्या नगरसेवकांमध्ये प्रतिभा पवार, अलका अहिरे, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, कावेरी घुगे, मुकेश शहाणे, निलेश ठाकरे, राकेश दोंदे या खान्देशच्या मातीशी संपर्क असलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील काही माजी मंत्री गिरीश महाजन यांना माननारे आहेत. एकनाथ खडसे यांच्या संपर्कात देखील आहेत. हे नगरसेवक काय भूमिका घेतात, हे भविष्यातच ठरेल. मात्र यानिमित्ताने खडसे गट सक्रीय झाला आहे, हे नक्की. 
...  
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख