चंद्रकांतदादांनी बोलविलेल्या बैठकीला एकनाथ खडसे हजर! म्हणाले....

भाजप खडसेंचे पुनर्वसन कसे करणार, यावर त्यांचा निर्णय अवलंबून राहणार आहे.
eknath khadase-chandrakant Patil.jpg
eknath khadase-chandrakant Patil.jpg

जळगाव : भाजपचे  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याचे संदर्भात काल एक `ऑडिओ क्लिप` व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाइन बैठक बोलाविली. या बैठकीला स्वतः  खडसे सहभागी झाले असल्याने त्यात काय चर्चा झाली याविषयी विविध तर्क आता लढविले जात आहेत.

या संदर्भात खडसे यांना विचारले असता त्यांनी बैठक झाल्याचा दुजोरा दिला आहे. या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्याविषयी, राज्यातील विविध समस्या आणि राजकीय घडामोडी बाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.  मात्र या बैठकीविषयी अधिक बोलणे त्यांनी टाळले आहे.

या बैठकीत सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय संघटन प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, विजय पुराणिक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.  माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणीस बिहार निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने ते ऑनलाइन बैठकीला अनुपस्थित होते. खडसेंनी मात्र या विषयावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

खडसे यांचा कार्यकर्त्याशी झालेला संवाद काल व्हायरल झाला होता. योग्य संधी मिळाल्यानंतर आपण भाजप सोडण्याचा विचार करू, असे खडसे यांनी त्यात म्हटल्याचे ऐकू येत होते. या क्लिपच्या सत्यतेविषयी खडसेंकडून इन्कार किंवा होकारही देण्यात आलेला नाही. खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान मिळाले नसल्याबद्दल त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे. त्यांना भाजपमध्ये कोणत्याच पदावर संधी मिळाली नसल्याने खडसे समर्थक अस्वस्थ आहे. त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा, यासाठी कार्यकर्ते त्यांच्याशी बोलत असतात. त्यातूनच हा संवाद झाला आणि ती क्लिप व्हायरल झाली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी खडसेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की नाही, हे समजू शकले नाही. मात्र या बैठकीला हजर राहून आपण पक्षासोबतच असल्याचे खडसे यांना दाखवून दिले आहे. 

राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा!

खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठोकपणे सांगत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जळगावमधील कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी अट घालावी, हे सांगण्याचा प्रयत्न केला. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लावण्याची ही सूचना होती. पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बैठकीस उपस्थित असलेल्यांनी सांगितले होते. आॅक्टोबर महिन्यातच खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. खडसे यांना राष्ट्रवादी कोणते पद देणार, यावर पुढील घडामोडी अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चर्चेनंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत खडसे यांना आमंत्रित करून भाजपने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. पक्षाने आपले योग्य पद देऊन पुनर्वसन करावे, अशी खडसे यांची अपेक्षा आहे. भाजप आता खडसेंना कसे शांत करणार, याकडे जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष राहील.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com