देवळा : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा (वसाका) गळीत हंगाम शनिवारी सरु झाली. यावेळी आमदार डॉ. राहूल आहेर यांना भाषण करताना वडिलांच्या आठवणींनी अक्षरशः रडू आले. ते भावनिक झाल्याने व्यासपीठावरील प्रमुख मंडळी देखील काही क्षण अस्वस्थ झाली होती. त्यामुळे परिसरासाठी महत्वाच्या या कारखान्याच्या गळीत हंगामाचा कार्यक्रम चुटपुट लावणारा ठरला.
या प्रसंगाला कारणही तसेच होते. देवळा व कळवण परिसरातील शेतक-यांसाठी हा साखर कारखाना अतिशय महत्वाचा आहे. तेव्हढाच हा परिसर टोकाचे राजकारण करणारा परिसर देखील आहे. त्यामुळे येथील कामगार, कार्यकर्ते, नेते राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक आहेत. माजी मंत्री डॉ. डी. एस. आहेर यांनी बंद पडलेला हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न केले होते. 2017 मध्ये कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करताना डॉ. आहेर यांची प्रकृती बरी नव्हती. मात्र आमदार झालेल्या डॉ. राहूल आहेर यांनी कारखाना सुरु करावा अशी त्यांची तळमळ होती. वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या आमदार आहेर यांना मुलगा म्हणून त्यावेळी वडिलासमवेत असायला हवे होते. मात्र राहू शकले नाही. त्यानंतर डॉ. डी. एस. आहेर यांचे निधन झाले. आपल्या भाषणातून हा प्रसंग सांगताना आमदार आहेर यांना आपल्या भावना आवरता आल्या नाही. व्यासपीठावर भाषण सुरु असतांनाच ते रडले.
वसाकाचे गतवैभव प्राप्त करु
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्यासह ऊस उत्पादकांची मागील देय रक्कम देण्यास धाराशिव साखर कारखान्याचे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. वसाकाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी वसाकालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.
यावेळी धाराशिव साखर कारखाना लि. युनिट २ संचालित वसाकाचा गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन व ऊसमोळीपूजन कार्यक्रम शनिवारी आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते वसाका कार्यस्थळावर झाला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर, धाराशिवचे चेअरमन अभिजित पाटील, वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे,अवसायक राजेंद्र देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, संतोष मोरे, भरत पाळेकर, बाळासाहेब बच्छाव, महेंद्र हिरे, भाई दादाजी पाटील, अभिमन पवार, काशीनाथ पवार, सुधाकर पगार, राजेंद्र पवार आदींसह सभासद, ऊस उत्पादक, कामगार उपस्थित होते.
...
.
https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

