छत्रपती संभाजीराजेंना, किमान विरोध ही करू नका! - Do not oppose sambhajiraje on Maratha reservation issue, Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

छत्रपती संभाजीराजेंना, किमान विरोध ही करू नका!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी मागील काळात मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राजकीय नेत्यांचे व पक्षीय कार्यालयाचे उंबरठे न झिजवता राजेंनी खेडोपाडी जावून सामान्य मराठ्यांचे प्रश्न जाणून घेतलेत.

नाशिक : युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी मागील काळात मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राजकीय नेत्यांचे व पक्षीय कार्यालयाचे उंबरठे न झिजवता राजेंनी खेडोपाडी जावून सामान्य मराठ्यांचे प्रश्न जाणून घेतलेत. त्यांना साथ देण्याची मानसिकता नसेल तर किमान विरोध तरी करू नका, असे छावा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनांना छेद देत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण व इतर प्रश्नांसाठी आंदोलनाचे नवे पर्व सुरू केले. कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागू नये हा आदर्श समोर ठेवून सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या लढ्यात सामान्य कार्यकर्त्यांना उतरवायचे नाही अशी भूमिका घेतली.

त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनजीवी व मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा घेणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. समाजाच्या मनात असलेली विश्वासाहर्ता काही लोकांच्या डोळ्यात खुपायला लागली. त्यांनी छुप्या मार्गाने राजेंवर टीका सुरू केली आहे. मात्र संभाजीराजे डगमगले नाही, समाजाच्या मागण्या कशाप्रकारे पूर्ण होतील, यासाठी असंख्य लोकांच्या भेटी घेतल्या. आरक्षणाचा,न्यायालयीन बाबींचा सर्वकश अभ्यास केला. जेवढे मुद्देसूद मांडणी राजे करतात त्याच्या एक टक्के देखील कोणताही राजकीय नेता आजच्या घडीला करू शकत नाही. कलम 342-अ , 338-ब या कलमाविषयी तर बोलके पोपट डोकं खाजवत बसतील. आरक्षणाचा नक्की मार्ग कोणता याचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यातून ही मागणी सर्व स्तरावर केली. 

आता आरक्षणाचा लढा मोठा होत असल्याचे लक्षात आल्यावर, मग तोपर्यंत समाजातील गरीब मराठा वर्ग सक्षम कसा होईल ह्याचा अभ्यास करून पाच मागण्या सरकार समोर ठेवल्या. जिथे सरकारी नोकऱ्या नगण्य झाल्या असताना मराठा तरुणांमध्ये कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणारी "सारथी" ही संस्था सक्षम करण्याची गरज राजेंनी हेरली. त्याचा अभ्यास करून पाठपुरावा केला. मराठा तरुणांना उद्योगांसाठी अर्थ पुरवठा करणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला योग्य तो निधी मिळण्याची मागणी पुढे आणली आहे. 

छत्रपती घराण्याचा वारसा चालवण्याची जबाबदारी संभाजीराजे उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. याचा समाजाला अभिमान आहे. राजकीय पोळी भाजनारे आणि समाजासाठी निस्वार्थ काम करणाऱ्यातला फरक सामान्य लोकांना कळू लागला आहे. त्यामुळे बाजारू राजकीय व्यक्तींनी राजेंवर किती टीका केली तरी, समाजासाठी जे कार्य त्यांनी हाती घेतली आहे त्याला नक्कीच यश येईल. त्यासाठी सर्वांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे.
...
हेही वाचा...

सलाम आजच्या हिरकणीला, ९ दिवसाच्या लेकीसह ग्रामपंचायत बैठकीत उपस्थिती

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख