Dinkar patil questioned BJP leaders politics and agitation | Sarkarnama

दिनकर पाटील यांचा भाजपला घरचा आहेर, म्हणाले, राज्य सरकार चांगले, आंदोलनाची गरज नाही

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचा सहभाग असल्याचा दावा करणाऱ्या भाजपवरच पाटील यांनी गुगली टाकली. पक्षाला घरचा आहेर दिला. केंद्र व राज्य सरकार चांगले काम करतं असल्याने आंदोलनाची गरज नसल्याचा पलटवार त्यांनी केला.

नाशिक : राज्य सरकारच्या विरोधात शहरात भाजपच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचा सहभाग असल्याचा दावा करणाऱ्या भाजपवरच पाटील यांनी गुगली टाकली. पक्षाला घरचा आहेर दिला. केंद्र व राज्य सरकार चांगले काम करतं असल्याने आंदोलनाची गरज नसल्याचा पलटवार त्यांनी केला. त्यामुळे आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या भाजपमध्ये खळबळ उडाली. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार करोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी राज्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. "मेरा आंगण, मेरा रणांगण' अशी घोषणा देत शहरातील आमदार, महापौर, नगरसेवक आणि शहर पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी ठिकठिकाणी काळे मास्क, काळे शर्ट घालून काळे फलक झळकावत राज्य सरकारचा निषेध केला. 

https://lm.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.sarkarnama.in%2Ftop-ne...

हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करणाऱ्या शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी थोड्याच वेळात उघडे पाडले. भाजपने शहरात आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करत, आंदोलनात सहभागी झालेल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची नावे माध्यमांना पाठवली होती. त्यात शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी पाठवलेल्या वृत्तात माजी सभागृहनेते आणि जेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनीही आंदोलन केल्याचा दावा केला होता. परंतु दिनकर पाटील यांनी आपण असे कोणतेही आंदोलन केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाटील यांनी आपण आंदोलन केल्याची खोटी माहिती देणाऱ्या भाजपच्या माध्यम विभागालाही चांगलेच झापले.  त्यानंतर शहर भाजपच्या जनसंपर्क विभागाने सुधारीत वृत्त पाठवत, दिनकर पाटील यांचे नाव वगळले. तसेत नवीन वृत्त घेण्याचे आवाहन माध्यमांना केले. 

भाजप प्रदेशाध्यक्षांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी आंदोलनाला पाटील यांनी निष्प्रभ ठरवले आहे. पाटील यांनी स्विकारलेल्या या पवित्र्यामुळे शहर भाजपचेच अंगण पक्षांतर्गत राजकारणाचे रणांगण होवून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकार प्रमाणेच राज्यशासनाचे काम चांगले असल्याने आंदोलनाची गरज काय? असा सवाल पाटील यांनी उपस्थित करत,भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. सर्वच जण करोना संकटाशी लढताहेत. त्यामुळे आंदोलन करण्याची ही वेळ नसून आपण काळे कपडे घातले नसल्याचे त्यांनी  स्पष्ट केले आहे. पाटील यांच्या या पवित्र्यामुळे भाजपने अर्धा तास केलेल्या आंदोलनावरच पानी फिरले आहे. श्री. पाटील यांच्या या पवित्र्याची भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
... 

 आंदोलन करून राज्य आणि देश करोनामुक्त होणार नाही.केंद्र आणि राज्यसरकारच्या पाठीशी या काळात उभे राहणे गरजेचे असून दोन्ही सरकार चांगले काम करत आहे.ही राजकारण करण्याची नव्हे तर जनतेला मदत करण्याची वेळ आहे.सध्या देशसेवा हीच खरी इश्वरसेवा आहे.त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालो नाही. 
दिनकर पाटील, माजी सभागृहनेता 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख