अण्णा, आता तर आपण महाविकास आघाडीचे, विसरला की काय?  - Dilip Bankar followers criticised Anil Kadam Workers | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णा, आता तर आपण महाविकास आघाडीचे, विसरला की काय? 

संपत देवगिरे
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

निफाड तालुक्यातील जनतेसाठी व विशेषतः पिंपळगाव बसवंत परिसरासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते दिलीप बनकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी १८ मार्च २००८ मध्ये येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळवली.

निफाड : निफाड तालुक्यातील जनतेसाठी व विशेषतः पिंपळगाव बसवंत परिसरातील नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते दिलीप बनकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी १८ मार्च २००८ मध्ये येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळवली. विरोधक काहीही राजकारण करीत असले, तरी ही वस्तुस्थिती नाकारूच शकणार नाही, असे उत्तर पिंपळगाव बसवंतचे माजी उपसरपंच सुरेश अंबादास खोडे यांनी दिले आहे.

पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी ५० खांटांच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड-१९ सेंटर सुरु केले. त्यावर त्यांचे विरोधक माजी आमदार अनिल कदम यांच्या समर्थकांनी या रुग्णालयाच्या श्रेयावरुन आमदार बनकर यांच्यावर टिका केली होती. यासंदर्भात श्री. खोडे यांनी कदम समर्थकांचे आरोप खोडले. ते म्हणाले, पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालय कोणी मजूर केले आणि कोणी लोकार्पण केले हे राजकारण करत बसण्यापेक्षा सध्याच्या स्थितीत जनता ज्या संकटात आहे ते जास्त महत्वाचे आहे. लोकांच्या दृष्टीने कोरोना काळात तालुक्यातील जनतेला उत्तम उपचार मिळावे हीच एक प्रामाणिक इच्छा लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान आमदार बनकर यांची आहे. मात्र विरोधकांनी राजकारणासाठी हा विषय उकरुन काढल्याने उत्तर देने क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात वस्तुस्थिती जनतेपुढे आली पाहिजे. 

आता विरोधकांनी राजकारण करु नये कारण जनतेला सर्व माहिती आहे. आमदार बनकर यांचा विषय निघालाच आहे, तर वस्तुस्थिती अशी आहे, की  पिंपळगाव बसवंतला ग्रामीण रुग्णालय असावे अशी संकल्पना तत्कालीन आमदार दिलीप बनकर यांची होती. त्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले. आमदार म्हणून ते महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटले. राज्यपालांच्या आदेशानुसार १८ मार्च २००८  ला पिंपळगाव बसवंत येथे विस्तारित ग्रामीण रुग्णालयाचे काम पुढे सरकले. त्यानुसार शासन दरबारी पाठपुरावा करून आरोग्यमंत्री (कै) विमलताई मुंदडा यांचेकडून तो मंजूर करून घेतला. त्यानुसार शासन निर्णय प्रसिद्ध झाला. २१ ऑक्टोबर २००८ मध्ये हे प्रकरण प्रशासकीय मान्यतेकरिता गेले. याचे सर्व पुरावे आहेत. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीकडून जागा हस्तातंरीत करण्यात आली. मात्र विरोधकांचे राजकारण म्हणजे, लग्नाच्या आधीचे पोर कुणाचं. आणि नंतरचं कुणाचं अस आहे.

मात्र हे सर्व करतांना ते काही गोष्टी विसरत आहेत. आता तर आपण सर्व महाविकास आघाडीमुळे व निफाडचे कारखाने सुरू करण्यासाठी समविचारी झालो आहोत. तेव्हा  अशात अनिल कदम यांच्या समर्थक  तालुकाप्रमुखांनी याची पुरेशी माहिती जवळ ठेवून मगच वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. 

पण आता काय म्हणावे, यांच्यामुळेच सगळा घोळ आहे. निफाड तालुक्याची जनता सज्ञान आहे म्हणून तरी बरे आहे. त्यांना खरे कोणते आणि खोटे कोणते यातील फरक नक्कीच समजतो. म्हणूनच आत्ताच कुठंतरी तालुक्याला सुगीचे दिवस आले आहेत.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख