नाशिक : गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये देवलाळीगाव व परीसरातील खातेदारांना नाशिकच्या तहसिलदारांनी अवाजवी व अनावश्यक नोटीस दिल्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वस्तुतः या नोटीस नियमाप्रमाणेच आहेत. बाजारमुल्याच्या २५ टक्के अधिमुल्य खातेदारांनी भरून पुढील विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ करून घ्यावी. ते त्यांच्या हिताचेच आहे, असे आवाहन तहसीलदार अनिल दौंडे यांनी केले आहे.
यासंदर्भात तहसिलदार श्री. दौंडे यांनी खुलासा दिला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत ७ सप्टेंबर २०१७ रोजी सुधारणा जारी केल्या आहेत. या अधिनियम २०१७ नुसार शासनाने जाहीर केल्यानुसार १५ सप्टेंबर १९६५ ते ६ सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये प्रमाणभुत क्षेत्र २० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा हस्तांतराने किंवा वाटपाने झाल्यास तो त्या क्षेत्राच्या बाजारमुल्याच्या २५ टक्के रक्कम अधिमुल्य म्हणुन भरुन नियमित करता येतो. त्यानुसार देवळाली गाव व परिसारातील तुकडे जोड तुकडेबंदी कायद्यानुसार ना-विकास विभाग ( ग्रीन झोन ) यामध्ये असलेल्या क्षेत्रात तुकडा पडलेला असेल व सदरचे क्षेत्र सध्या विकास विभागात (यलो झोन) असल्याने एकुण बाजारमुल्याच्या २५ % अधिमुल्याची रक्कम भरावी लागते. त्यानंतर ती जमीन नियमित करता येईल. प्रसिद्ध झालेल्या बातमीतील देवळाली गावातील गट नंबर २०१ या जमिनीच्या खातेदारांचे क्षेत्र १८ गुंठे आहे. सदरचा जमिनीचा तुकडा वाटपाने सन २००२ मध्ये पडलेला आहे. त्यामुळे सदर क्षेत्राचे बाजारमुल्य रक्कम ९८.२८ लाख असल्याने नियमानुसार नोटीस दिली आहे. त्यात त्याच्या २५ टक्के अधिमुल्याची रक्कम २४.57 लाख रूपये भरल्यास तो तुकडा नियमित करता करण्यात येईल.
याबाबत दिलेल्या नोटीस शासन नियमानुसारच आहेत. नोटीस दिलेल्या खातेदारांनी सदर सुधारणा अधिनियमानुसार बाजारमुल्याच्या २५ टक्के अधिमुल्याची रक्कम भरल्यास सदरचे तुकडे नियमित होतील. त्यामुळे खातेदारांना आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही. अशा प्रकारच्या नियमितीकरणामुळे त्यांची पुढील विकासाची प्रक्रिया सुलभ होईल. त्यात शेतक-यांचाच फायदा आहे असेही तहसिलदार दौंडे यांनी नमूद केले आहे. .....

