देविदास पिंगळेच्या निर्णयाने आमदार दिलीप बनकर टिकेचे धनी?  - Devidas Pingle took action against traders In APMC | Politics Marathi News - Sarkarnama

देविदास पिंगळेच्या निर्णयाने आमदार दिलीप बनकर टिकेचे धनी? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

जिल्ह्यातील नाशिक आणि पिंपळगाव बसवंत या दोन्ही बाजार समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची सत्ता आहे. मात्र या दोन्ही बाजार समित्यांत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहानीच्या घटना घडल्या. त्यात माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी शेतकऱ्याची बाजू घेत नाशिकच्या बाजार समितीतील व्यापाऱ्याचा चार दिवसांत परवाना रद्द केला.

नाशिक : जिल्ह्यातील नाशिक आणि पिंपळगाव बसवंत या दोन्ही बाजार समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची सत्ता आहे. मात्र या दोन्ही बाजार समित्यांत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहानीच्या घटना घडल्या. त्यात माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी शेतकऱ्याची बाजू घेत नाशिकच्या बाजार समितीतील व्यापाऱ्याचा चार दिवसांत परवाना रद्द केला. मात्र पिंपळगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर या विषयांची तुलना करीत पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर चांगलेच टिकेचे धनी ठरले. 

काही दिवसांपूर्वी उमराणे (देवळा) येथील अशोक देवरे हे शेतकरी कोथिंबीर विक्रीसाठी नाशिकच्या बाजार समितीत आले होते. यावेळी लिलिवादरम्यान योग्य दर मिळत नसल्याने श्री. देवरे यांनी कोथंबीर अन्य बाजार समितीत विक्रीला नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मोहन खांडबहाले या व्यापाऱ्याशी त्यांचा वाद झाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने चांगलीच चर्चा झाली. तो बाजार समितीचे सभापती पिंगळे यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी त्याची दखल घेत संबंधीत व्यापाऱ्याला समज दिली. त्याचा परवाना रद्द केला. शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने त्याचा चांगला संदेश गेला. 

असाच एक प्रसंग पिंपळगाव बाजार समितीत घडला. येथील एका शेतकऱ्याने टोमॅटोची विक्री केली होती. या टोमॅटोचे पैसे घेण्यासाठी आडतदारांकडे गेल्यावर त्यांच्याशी त्याची शाब्दीक चकमक घडली. यातून वाद होऊन आडतदाराकडून शेतकऱ्याला मारहान झाली. या घटनेने चांगलाच गदारोळ झाला. त्याची बातमी देखील माध्यमांत प्रकाशित झाली. त्यानंतर नाशिक व पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील या दोन्ही घटनांची तुलना होऊ लागली. कांहींनी ही कात्रणे फेसबुकवर टाकून शेअर करीत "शेतकऱ्यांना कोण वाली?. पिंगळे यांचा आदर्श घ्या' अशी पोस्ट व्हायरल झाली. त्याला सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळाले. त्यामुळे त्यावरुन राजकीय टिकेला सुरवात झाली. वस्तुतः आमदार बनकर यांनी देखील या घटनेची दखल घेऊन संबंधीत व्यापाऱ्याला समज दिली. त्या व्यापाऱ्याने माफीनामा लिहून दिला. संबंधीत शेतकऱ्याचे देखील समाधान झाले. मात्र यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नेत्यांची तुलना होऊन विरोधकांना एक राजकीय विषय मिळाला. अर्थात यामध्ये बाजार समितीत वाद झाल्यास संचालक मंडळाकडे शेतकरी दाद मागू शकतात. खाजगी बाजार समितीत किंवा बांधावर झालेल्या खरेदीत अशी घटना घडल्यास शेतकरी कोणाकडे दाद मागणार या प्रश्‍नाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष झाले. 
... 
संबंधीत आडतदाराला कार्यालयात बोलावून समज देण्यात आली आहे. त्यांनी समितीकडे माफीनामा लिहून दिला आहे. त्याबाबत शेतकऱ्याचे देखील समाधान झाले आहे. बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे हित जपले जाते. त्याबाबत संचालक मंडळ जागरूक असते.

- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती. 
... 
आमची बाजार समिती शेतकऱ्यांसाठीच काम करते. शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी सतत काम केले जाते. त्यामुळेच नाशिक बाजार समितीची प्रतिष्ठा वाढत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांत विश्‍वास निर्माण झाला पाहिजे, यासाठी आम्ही काम करीत असतो.

- माजी खासदार देवीदास पिंगळे, सभापती. नाशिक बाजार समिती. 
.. 
 

 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख