महासभेत नाशिकच्या स्मार्टसिटी प्रकल्पांची चिरफाड 

गेल्या पाच वर्षांपासून शहरात स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचा लेखाजोखा मांडण्यासाठी बोलाविलेल्या विशेष महासभेला स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दांडी मारल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांना स्मार्ट प्रकल्पांची चिरफाड करीत स्मार्टसिटी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली.
NMC GB
NMC GB

नाशिक : गेल्या पाच वर्षांपासून शहरात स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचा लेखाजोखा मांडण्यासाठी बोलाविलेल्या विशेष महासभेला (Special GB on Smart city projects) स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल (Smart city CEO Thavil Absent) यांनी दांडी मारल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांना स्मार्ट प्रकल्पांची चिरफाड करीत स्मार्टसिटी कंपनी (corporator deemand Dismissal of Smart city) बरखास्त करण्याची मागणी केली.

महासभेची अवहेलना केल्याने थविल यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांची चौकशी करण्याबरोबरच शासनाकडे बदलीचा ठराव पाठविण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतला. 

माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, मुकेश शहाणे, समिना मेमन यांनी स्मार्टसिटीच्या कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी विशेष महासभा घेण्याचे पत्र महापौर कुलकर्णी यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी ऑनलाइन महासभेचे आयोजन करण्यात आले. 

सभेच्या प्रारंभीच सदस्य उपस्थित करणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी थविल यांच्या अनुपस्थितीबद्दल जाब विचारण्यात आला. नगरसचिवांनी थविल यांनी सादर केलेल्या पत्राचे वाचन केले. स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना संचालक मंडळ जबाबदार असल्याचे पत्रात नमूद करताना कंपनी कायद्यानुसार आयुक्तांवर जबाबदारी ढकलली. त्यामुळे सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, की विशेष महासभेचे आयोजन केल्यानंतर थविल अनुपस्थित राहिल्याने त्यांनी महासभेचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट मागणी केली. 

स्मार्ट कामांबाबतच्या तक्रारी मांडल्यानंतर उत्तरे देणारे जबाबदार व्यक्ती नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. स्मार्टसिटी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा उल्लेख करताना स्मार्टसिटीच्या नावाखाली शहर भकास केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. स्मार्टसिटी कामांसाठी अतिरिक्त सहाशे कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागतील. महापालिकेच्या लेखापरिक्षकांनी स्मार्टसिटीच्या कामांचे लेखापरिक्षण करावे, थविल यांच्यावर कारवाईची मागणी केली. 

थविल यांच्यामुळे स्मार्टकामांचा बोजवारा 
कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी थविल यांनी संचालक मंडळ जबाबदार असल्याचे पत्र देऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आव्हान दिल्याचा आरोप केला. उद्दाम वागणाऱ्या थविल यांच्यामुळे स्मार्टकामांचा बोजवारा उडाला. गोदापात्रात सुरू असलेली कामे बेकायदेशीर आहेत. स्मार्टसिटीची कामे बंद करण्याची मागणी त्यांनी केली. पाच वर्षे उलटूनही स्मार्टसिटीची कामे झाली नाहीत. आतापर्यंत फक्त २५ टक्केदेखील कामे झाली नाही, ही शोकांतिका असल्याचा सुधाकर बडगुजर यांनी आरोप केला. स्मार्टसिटीच्या कमांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्फत चौकशी करावी, सहा हजार क्युबिक मीटर कामांचा दर असताना नऊ हजार रुपये क्युबिक मीटर दराने काम दिल्याने त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी बडगुजर यांनी केली. 

सभागृह नेते कमलेश बोडके, हेमलता पाटील, हिमगौरी आडके, गुरमितसिंग बग्गा, मनसेचे सलीम शेख, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंढे, शिवाजी गांगुर्डे, सुनील गोडसे, भाजप गटनेते अरुण पवार यांनी थविल यांच्या कामकाजावर टीका केली. थविल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने चौकशी होईपर्यंत नवीन अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याची मागणी केली. त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी थविल यांच्या चौकशीचा निर्णय दिला. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com