बेड नसल्याने कोरोनाबाधित रूग्ण पोहोचले थेट महापालिकेत! 

सिडको भागातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने पालिका मुख्यालयासमोर दोन्ही रुग्णांनी ठिय्या दिल्याचा प्रकार घडला. दोन्ही रुग्णांना तातडीने नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून भरती करण्यात आले.
THiyya
THiyya

नाशिक : सिडको भागातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने पालिका मुख्यालयासमोर दोन्ही रुग्णांनी ठिय्या दिल्याचा प्रकार घडला. दोन्ही रुग्णांना तातडीने नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून भरती करण्यात आले.

दरम्यान, शहरात सरकारी व खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध असून, ज्यांना बेड मिळत नाही त्यांच्यासाठी पालिकेची हेल्पलाइन असतानाही थेट मुख्यालयात कोरोना रुग्णाला आणण्याच्या प्रकारामागे सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाही, याची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले. 


शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेतर्फे सर्वसाधारण व ऑक्सिजन बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिम व महापालिकेतर्फे बेड उपलब्ध करून देण्यासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे असताना सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी सिडकोच्या कामटवाडे व डीजीपीनगर भागातील प्रत्येकी एक अशा दोन रुग्णांना बेड मिळत नसल्याची तक्रार करत बुधवारी थेट महापालिका मुख्यालयाबाहेर बसविले. यातील एका रुग्णाने ऑक्सिजन सिलिंडरसह ठिय्या दिला.

ऑक्सिमीटरद्वारे रुग्णाची तपासणी केली असताना ३६ टक्के ऑक्सिजन लेव्हल दर्शविली जात असल्याचे श्री. डोके यांनी दाखविले. जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर महापालिकेच्या बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तेथेही बेड शिल्लक नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचा दावा डोके यांनी केला. आयुक्त जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर देखल घेत अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना घटनास्थळी पोचण्याच्या सूचना दिल्या. अष्टीकर यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून बिटको रुग्णालयात रुग्णांना दाखल केले. शिवसेना गटनेते विलास शिंदे व नगरसेवक सुधाकर बडगुजर या वेळी उपस्थित होते. 

प्रशासनाकडून होणार चौकशी 
महापालिकेच्या बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये साडेचार हजारांहून अधिक बेड आहेत. पालिकेच्या डॅशबोर्डवरदेखील बेडची माहिती आहे. बेड मिळत नसल्यास हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त जिल्हा रुग्णालय, मविप्र रुग्णालयातदेखील बेड उपलब्ध आहेत. असे असताना बेड मिळत नसल्याची डोके यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. रुग्णांना दाखल करण्यासाठी कोणाशी संपर्क केला? तीन दिवस रुग्ण कोणाच्या संपर्कात आला? सार्वजनिक ठिकाणी कोरोना रुग्ण बाहेर कसे पडले? तसेच या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांची चौकशी केली जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना महापालिका व सरकारला बदनाम करण्यासाठी स्टंटबाजी तर केली जात नाही ना, ही बाबदेखील तपासली जाणार आहे. 
...
बेड मिळण्यासाठी रुग्णांनी कोणाला संपर्क केला होता. खरोखरच तशी बाब समोर आल्यास संबंधितांवर कारवाई होईलच, त्याव्यतिरिक्त प्रशासनाला बदनाम करण्याचा हेतू तर नाही ना, याची देखील चौकशी केली जाणार आहे. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com