नाशिक : कोविड माहामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेतील 28 दिवसांनंतर देण्यात येणाऱ्या लसीकरणाची यादी अद्यावत करण्यात यावी. बूस्टर डोस सर्वांनी वेळेत घ्यावा. त्याची प्रशासनाने सतत शहानिशा करावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, 16 जानेवारी पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आलेल्या लसीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संबंधितांना अवगत करणे आवश्यक असल्याने त्यासाठी योग्यते नियोजन करण्यात यावे. तसेच ज्या अधिकारी कर्मचारी यांनी लसी घेतली नाही, त्यांना देखील लस घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी लसीकरण मोहिमेचे काम करणाऱ्या अधिका-यांना दिले आहेत.
ते म्हणाले, नागरिकांसाठी सुद्धा काही दिवसातच लसीकरणाचे प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे याबाबत देखील सर्व स्तरावर योग्य ती व्यवस्था असल्याची खात्री करावी अशा सूचना देखील श्री मांढरे यांनी दिल्या. त्याचप्रमाणे आजपर्यंतच्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये ज्या बाबींमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक वाटत आहे याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त करून घेण्याच्या सूचना दिल्या. लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे गरजेचे असून त्यामुळेच कोविड विषाणूच्या संसंर्गापासून बचाव होण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत साधारण 41 हजार 807 लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहितीदेखील जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी बैठकीत दिली आहे.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे सव्हर्लन्स मेडीकल ऑफीसर डॉ. प्रकाश नांदापुरकर आदी उपस्थित होते.
...

