गुजरातमुळे महाराष्ट्रा होतेय कोरोनाची आयात-निर्यात? - Covid patients increase inGujrat sarounded villlages, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

गुजरातमुळे महाराष्ट्रा होतेय कोरोनाची आयात-निर्यात?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

जिल्हाबंदी असूनही त्यांची तपासणीही होत नसल्याने या सीमावर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या तक्रारी असून येथील गावे असुरक्षित बनली आहेत.

नाशिक : राज्यातील विविध जिल्ह्याच्या सीमा गुजरात राज्याशी निगडीत आहेत. या भागात नियमित नागरिकांची ये-जा व वाहतूक सुरु आहे. जिल्हाबंदी असूनही त्यांची तपासणीही होत नसल्याने या सीमावर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या तक्रारी असून येथील गावे असुरक्षित बनली आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने जिल्हाबंदी करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून जायखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत एक आंतरराज्य हद्द व दोन जिल्हा हद्दीवर पोलिस तपासणी केंद्र असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. येथे महाराष्ट्र - गुजरातची सीमा असल्याने पोलिस प्रशासन अधिकच सतर्क आहे. नागरिकांनी महत्वपूर्ण काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी (जायखेडा) यांनी केले आहे.

सुरगाणा, पेठ, बागलाण तालुक्यात देशी भागासह पश्‍चिम आदिवासी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने काही रुग्ण शेजारील गुजरात राज्य व धुळे जिल्ह्यातून ये - जा करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गुजरात - महाराष्ट्र सरहद्दीवर बाभुळणे (चिंचली घाट) येथे व नाशिक - धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील विंचूर - प्रकाशा राज्य मार्गावरील कातरवेल, नामपूर परिसरातील चिराई येथे पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. त्यात अत्यावश्यक सेवा शेती माल व इतर आरोग्य सुधारणा विषयक सेवा असल्यास ई-पासद्वारे चौकशी करून सोडण्यात येत आहे. जायखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत ९५ गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ४३ पोलिस कर्मचारी व १७ होमगार्डची मदत घेतली जात आहे. हद्द तपासणीसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्णा पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम. एम. नवगिरे, पोलिस हवालदार राजेंद्र वाघ, निंबा खैरनार, बापू फंगाळ, श्री. बच्छाव आदी कर्मचारी काम पाहत आहेत.

सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा, सुरगाणा शहरालगतची बोरगावजवळची गावे, निंबारपा़डा, रगतविहीर, खुंटविहीर, हडकाईचोंड, पिंपळसोंड, सागपाडा यांसह विविध पाडे व गावे गुजरातच्या सीमेवर आहेत. येथील नागरिक रोजगारासह बाजारासाठी गुजरातला जातात.गुजरातमधून विविध नागरिक येथे रोजच ये जा करतात. त्यामुळे या भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या महिन्यात या भागात कोरोनाचा संसर्ग अभावानेच होता. मात्र सध्या त्यात गतीने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग तसेच पोलिस देखील सावध झाले आहे.   

...

जिल्हाबंदीचा आदेश असल्याने तपासणी नाक्यावर पोलिसांबरोबरच आरोग्य विभागाचे कर्मचारी तपासणीसाठी असल्यास अधिक योग्य होईल. नागरिक, दुकानदार, वाहनधारकांनी विनाकारण बाहेर न पडता घरातच थांबून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख