मर्सिडीजच्या इंजिनचा स्फोट ; अमरिशभाई पटेल यांचा पुतण्या ठार

अपघात इतका भीषण होता की कारची पुढील चाके व इंजिन बोनेट तोडून बाहेर फेकले गेले. जमिनीवर आदळून इंजिनचा स्फोट झाला.
collage (6).jpg
collage (6).jpg

शिरपूर : येथील उद्योगपती, नगरपालिकचे बांधकाम सभापती तपन मुकेशभाई पटेल (वय 39) यांचे आज  (ता.30) मध्यरात्री एक वाजता अपघाती निधन झाले. सावळदे (ता.शिरपूर) येथील एनएमआयएमएस कॅम्पसच्या गेस्ट हाऊसमध्ये मित्राला सोडवून तपन पटेल घरी परत जात होते.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कुरखळी (ता.शिरपूर) फाट्यापुढे हॉटेल गॅलेक्सीसमोर त्यांच्या मर्सिडीज कार (एमएच 18 एएक्स 8) ने रस्ता दुभाजकाला धडक दिली. धडकेनंतर कार दुभाजकावरून घरंगळत गेली. हा अपघात इतका भीषण होता की कारची पुढील चाके व इंजिन बोनेट तोडून बाहेर फेकले गेले. जमिनीवर आदळून इंजिनचा स्फोट झाला. कारचा पायाकडील भाग चेपल्याने तपन पटेल यांना कमरेखाली गंभीर स्वरूपाची इजा झाली. 

सीट बेल्ट लावलेला असल्याने ते अडकून पडले. महामार्गावरून जाणारे वाहनचालक व हॉटेलवरील उतारू अपघातस्थळी धावले. त्यांनी कारच्याखालून पटेल यांना ओढून बाहेर काढले. महामार्ग सेवेच्या रुग्णवाहिकेने त्यांना येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना  काही वेळातच त्यांचे निधन झाले.

अपघाताचे वृत्त कळताच मध्यरात्री पालिका रुग्णालयाबाहेर युवकांची प्रचंड गर्दी जमली. पहाटे चारला तपन पटेल यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. सायंकाळी पाचला करवंद नाका येथील फार्मसी कॅम्पसमध्ये तपन पटेल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर येथील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिरपूर टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष, श्री विलेपार्ले केलवणी मंडळाचे विश्वस्त, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदी पदांवर तपन पटेल कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगे, काका असा परिवार आहे. राज्यसभेचे माजी खासदार (कै.) मुकेशभाई पटेल यांचे ते पुत्र, माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे ते पुतणे होत.

तपन यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झाले होते  इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊनही तपन पटेल यांची नाळ तालुक्याशी घट्ट जुळली होती. पटेल कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीतील राजकीय वारसदार म्हणून तपन पटेल यांच्याकडे पाहिले जात होते. विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले होते. स्पष्टवक्तेपणा, दातृत्व व संघटन कौशल्यामुळे ते सर्व स्तरात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com