Corona spread out due to migrants in Nashik, Night curfew will implimented | Sarkarnama

छगन भुजबळ म्हणाले, बाहेरून आलेल्यांमुळे नाशिकची स्थिती बिघडली

संपत देवगिरे
मंगळवार, 30 जून 2020

नाशिक शहरात गेल्या महिनाभरात कोरोना संसर्गाने रुग्ण व मृत्यू दोन्हीत वाढ झाली. त्यामुळे प्रशासनाला अधिक कठोर व्हावे लागणार आहे. यापुढे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री छगन बुजबळ यांनी केली आहे,. 

नाशिक : बाहेरुन आलेल्यांनी नाशिक शहरातील कोरोनाचा संसर्ग व स्थिती चिघळवली. महिनाभरात रुग्ण व मृत्यू दोन्ही वाढले. त्यामुळे अधिक कठोर उपाय केले जात आहेत. शहरात लॉकडाउन अधिक कडक केले जाणार आहे. शहरात सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदीसारखेच वातावरण राहील, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

नाशिक शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. बुजबळ यांनी शासकीय विश्रामगृहावर व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी ते म्हणाले, की गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सम-विषम फॉर्म्युला रद्द करण्याची मागणी अमान्य केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. व्यापाऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करून, बाजारपेठेतील वाढती गर्दी विचारात घेता, यापुढे सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत लॉकडाउन अधिक कडक केले जाणार आहे. कर्फ्यूसारखेच वातावरण राहील. दुपारी, रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांना यातून वगळण्यात येणार आहे. गरज पडल्यास ग्रामीण भागात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात असा निर्णय घेतील. 

ते म्हणाले, की शहरात ठक्कर डोम येथे उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरला काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. असे असले तरी नागरिकांनी सहानुभूतिपूर्वक विचार करावा, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले. ते म्हणाले, छोटे सेंटर उभारण्यापेक्षा 300-400 बेडचे सेंटर उभारणे आवश्‍यक आहे. भविष्यातदेखील त्याची गरज पडू शकते. त्यामुळे तयारीचा भाग म्हणून कोविड सेंटर उभारले जात आहे. कोरोना विषाणूचा हवेतून नव्हे तर स्पर्शातून प्रसार होत असल्याने त्यामुळे स्थानिकांनी घाबरू नये. या भागात निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. आरोग्य विभागाला सदैव कार्यरत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड उपचारासाठी मदत म्हणून 200 डॉक्‍टरांना निमंत्रित केले होते. मात्र अवघे 30 डॉक्‍टर बैठकीला आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, की बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे शहरातील कोरोना परिस्थिती चिंताजनक बनली. वयोमानाचा विचार करता 40 ते 55 गटातील नागरिकांत संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर कोरोना वाढला. मात्र तरीही शहराच्या सीमा सील केल्या जाणार नाहीत. भारत-चीन सीमेवरील तणाव लक्षात घेता, व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांच्या वाढीव वीजबिलासंदर्भातील तक्रारी शासनदरबारी मांडू. ही स्थिती लक्षात घेता, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर पडल्यानंतर शासनाच्या निर्देशाचे पालन करावे. बाजारपेठेतील गर्दीचा अभ्यास करून नियंत्रणासाठी प्रयत्न केला जाईल.

या वेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
...  
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख