प्रशासक नियुक्तीच्या सूत्राने नाशिक कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता!

ग्रामपंचायतीत ज्या पक्षाचे सरपंच असतील, तेथे त्याच पक्षाचा व मावळत्या सरपंचाचा सल्ला विचारात घेऊन प्रशासकाची नियुक्ती करण्याचे सूत्र ठरले. यामध्ये अस्तित्वहीन कॉंग्रेस प्रशासक नियुक्तीत कोरडीच राहण्याची चिन्हे आहेत.
प्रशासक नियुक्तीच्या सूत्राने नाशिक कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता!

नाशिक : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींत प्रशासक नियुक्तीचा विषय सध्या ग्रामीण राजकारणात कळीचा मुद्दा बनला आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी ग्रामपंचायतीत ज्या पक्षाचे सरपंच असतील, तेथे त्याच पक्षाचा व मावळत्या सरपंचाचा सल्ला विचारात घेऊन प्रशासकाची नियुक्ती करण्याचे सूत्र ठरले. यामध्ये अस्तित्वहीन कॉंग्रेस प्रशासक नियुक्तीत कोरडीच राहण्याची चिन्हे आहेत. 

ग्रामपंचायत प्रशासकाची नियुक्ती करताना योग्य व्यक्तीची निवड करण्यावर भर द्यायचा आहे. यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक झाली. कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांसह विविध आमदार, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. बैठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे पक्षाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या वेळी वरिष्ठ पातळीवरून निश्‍चित झालेल्या सूत्राची माहिती देण्यात आली. त्यानुसार प्रत्येक तालुक्‍यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे तिन्ही तालुकाध्यक्ष एकत्र येतील. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार त्यासाठी समन्वय करतील. त्यानुसार ज्या गावात मावळता सरपंच ज्या पक्षाचा असेल, त्या सरपंचाशी सल्लामसलत केली जाईल. त्याच्या सूचेननुसार त्याच पक्षाचा प्रशासक निश्‍चित केला जाईल. तिन्ही तालुकाध्यक्षांच्या संमतीने ती यादी पालकमंत्र्यांना सादर होईल. पालकमंत्र्यांचे कार्यालय त्यावर शिक्कामोर्तब करून ही नावे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदेश काढून नियुक्ती करतील, असे समजते. 

यामध्ये संघटनात्मक बांधणी व गावपातळीवरील यंत्रणा प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसमध्ये एवढा विसंवाद आहे, की त्यांनी याचा विचारच केलेला नाही. अगदी बैठकीतही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मान डोलावण्यापलीकडे काहीच केले नाही, अशी पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे या सूत्रानुसार इगतपुरी, चांदवड, कळवण व बागलाण वगळता जिल्ह्याच्या अन्य भागांत कॉंग्रेसच्या हाती काहीही लागण्याची शक्‍यता आहे.

कार्यकर्त्यांच्या मते, या स्थितीत राज्यात सरकार स्थापन झाले. मात्र त्याचा कॉंग्रेसला तळागाळात काहीही उपयोग होताना दिसत नाही. थोडक्‍यात कॉंग्रेसच्या नेत्यांना काहीही न करता प्रत्येक तालुक्‍यात काही गावांत प्रशासकांच्या नियुक्‍त्या अपेक्षित आहेत. राज्यातील आमदारांच्या संख्येनुसार प्रत्येक तालुक्‍यात काही पदांचे वाटप पक्षाच्या नेत्यांना व्हावे. ते प्रत्यक्षात येण्याची चिन्हे नाहीत. अगदी नाशिक तालुक्‍याचा विचार केल्यास येथे 25 ग्रामपंचायतीत प्रशासक नियुक्त करायचे आहेत. विद्यमान सरपंच विचारात घेतल्यास यातील नव्वद टक्के प्रशासक शिवसेनेचे असतील. उर्वरित राष्ट्रवादीकडे जातील. कारण येथे कॉंग्रेसचे अस्तित्व मोजक्‍या गावांतच आहे. त्या जागाही अन्य पक्षांना जातील. अशा स्थितीत आघाडीतील सहकारी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसला साथ द्यावी, अशी कॉंग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे. सध्या तरी तशी काहीही चिन्हे नसल्याने कॉंग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. 
...  
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=zOkpGagCTKIAX87QsWa&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=0ebe751f396f712fc9a8a97964a8574d&oe=5F30FAA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com