नाशिक : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आघाडीविषयी भविष्यात काय निर्णय व्हायचा तो होईल. मात्र कॅांग्रेस पक्षाच्या नेत्यांनी गाफील राहू नये. महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात समिती स्थापन करावी. स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस समितीचे अध्यक्ष, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
श्री. थोरात यांच्या उपस्थितीत आज येथील एमराल्ड पार्क हॅाटेल येथे शहर कॅांग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी विविध सुचना केल्या. ते म्हणाले, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परस्परांतील समन्वय वाढवावा. आगामी महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी नियोजन करावे. त्याच्या तयारीला लागावे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात दोन्ही कॅांग्रेससह शिवसेना एकत्र काम करीत आहेत. या तिन्ही पक्षांनी एकत्रीतपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा धोरणात्मक निर्णय यापूर्वी जाहीर झाला होता. मात्र प्रत्यक्षात काय निर्णय होईल हे भविष्यात वरिष्ठ नेते व राजकीय परिस्थितीचा विचार करुनच ठरेल.
श्री. थोरात पुढे म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीची तयारी तातडीने सुरु करावी. त्यासाठी महापालिकेच्या सध्याच्या सर्व 122 प्रभागांत समित्या स्थापन कराव्यात. प्रत्येक प्रभागात किमान वीस सदस्यांची समिती स्थापन करावी. वीस जणांची ही समिती झाल्यास शहरात जवळपास दोन हजार कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करतील. त्याने वातावरण निर्मितीला चालना मिळेल. तशी तयारी झाल्यास त्याचा आघाडी झाली तरीही फायदा होईल. आघाडी झाली नाही तीर स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्याचा फायदा होईल.
यावेळी आमदार डॅा. सुधीर तांबे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी राज्यमंत्री डॅा शोभा बच्छाव, आर. आर. पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक राहूल दिवे, प्रवक्त्या डॅा हेमलता पाटील, महापालिकेतील गटनेते शाहू खैरे, वत्सलाताई खैरे, आशाताई तडवी, विमल पाटील, हनीफ बशीर, सुरेस मारु, उद्धव पवार, बबलु खैरे, लक्ष्मण जायभावे आदी उपस्थित होते.
...

