Congress can't find a person for the presidency in this city  | Sarkarnama

कॅाग्रेसला 'या' शहरात अध्यक्षपदासाठी व्यक्ती सापडेना...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 जुलै 2020

जळगाव शहरात तर पक्षाची परिस्थिती गेल्या वीस वर्षापासून अत्यंत कमकुवत आहे. जळगाव महापालिकेत या पक्षाचा गेल्या वीस वर्षात एकही नगरसेवक निवडून आलेला नाही.

जळगाव : राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या कॉंग्रेसला जळगाव शहरासाठी गेल्या सात महिन्यापासून शहराध्यक्षपदसाठी व्यक्ती सापडत नसल्याची स्थिती आहे. राज्यात कॉंग्रेस सत्तेत सहभागी असली तरी जळगाव
जिल्ह्यात मात्र कॉंग्रेस अत्यंत कमकुवत आहे. जळगाव शहरात तर पक्षाची परिस्थिती गेल्या वीस वर्षापासून अत्यंत कमकुवत आहे. जळगाव महापालिकेत या पक्षाचा गेल्या वीस वर्षात एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार असतांना कॉंग्रेसची जिल्ह्यात स्थिती काहीअंशी बरी होती. तरी जळगाव शहरात मात्र कॉंग्रेस फारशी ताकद मिळालीच नाही. त्यामुळे पालिका आणि आता महापालिका निवडणूकीतही कॉंग्रेसला साधा एक नगरसेवक निवडून आणण्याचे यश मिळालेच नाही.

शहरात कॉंग्रेस कमकुवत असतांनाही जिल्हाअध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारून डॉ. राध्येश्‍याम चौधरी यांनी शहर कॉंग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी नागरिकांच्या प्रश्‍नावर आंदोलन उभे केले होते. काही भागात कॉंग्रेसच्या शाखाही सुरू केल्या होत्या. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या काळात पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचा बेबनाव झाल्यामुळे त्यांनी कॉंग्रेसला राम राम करीत भारतीय जनता पक्षात
प्रवेश केला. डॉ. चौधरी यांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्हाअध्यक्षपदाची जबादारी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्याकडे सोपविणयात आली. राज्यात कॉंग्रेस सत्तेत भागीदार झाल्यानंतर पक्षाला ताकद मिळविण्यासाठी
शहराध्यक्षपद नियुक्त केला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र तब्बल सहा महिन्यानंतरही कॉंग्रेसने शहराध्यक्षपदी कोणाचीही घोषणा केलेली नाही. जळगाव शहरात कॉंग्रेस कमकुवत असल्यामुळे या पदासाठी कोणीही व्यक्ती
पक्षाच्या वरिष्ठांच्या नजरेत नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

कॉंग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी वामसी रेड्डी यांच्याकडे ही जबाबदारी आहे. मात्र, त्यांनीही अद्याप कोणाचेही नाव दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच राज्यातील काही जिल्ह्यातील जिल्हा व महानगराध्यक्ष घोषित केले. त्यावेळी त्यांनी जळगाव शहरासाठीही जिल्हा महानगराध्यक्षपदासाठी नावे मागविली होती. मात्र, त्यांच्याकडे नावेच गेली नसल्याचे सांगण्यात आले. शहराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसला प्रभावी व्यक्ती हवा असून सद्यस्थितीत कोणतेही नाव समोर येत नसल्याने हे पद रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या कोणत्याही पक्षाच्या शहराध्यक्ष पदासाठीअक्षरश: रस्सीखेच सुरू असते. परंतु जळगावात मात्र, कॉंग्रेस महानगराध्यक्षपदासाठी पक्षाला व्यक्ती मिळत नसल्याची शोकांतिका आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख