Com Kasar says now i will make malegao coronafree | Sarkarnama

कोरोनाला हरवल्यावर त्र्यंबक कासार म्हणाले, `आता मालेगाव कोरोनामुक्त करीन'

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

दहा दिवसांनंतर ते कोरोनामुक्त झाले. यावर प्रतिक्रीया विचारली असता, ते म्हणाले, आता शहर कोरोनामुक्त करण्यासाठी झटू.

मालेगाव : शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी थेट मैदानात जाऊन काम करणारे महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनाच कोरोनाने ग्रासले होते. मात्र दहा दिवसांनंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत. यावर प्रतिक्रीया विचारली असता, ते म्हणाले, आता शहर कोरोनामुक्त करण्यासाठी झटू. 

श्री. कासार १३ मेस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत असतानाच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर ते बैठक सोडून बाहेर पडले होते. आयुक्तांसह सहाय्यक आयुक्त पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाची आढावा बैठक, कोविड रुग्णालयाचे दौरे, शहरातील विविध शिष्टमंडळांच्या भेटी यातून त्यांना लागण झाल्याची शक्‍यता होती. यानंतर महापालिकेच्या बहुसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. आयुक्तांनी दहा दिवस होम आयसोलेट असताना घरून कामकाज केल. सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम करत, सकारात्मक विचार व कामकाज करून त्यांनी कोरोनाला परतवून लावल्याचे सांगितले. 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

ते म्हणाले, सगळे जण सध्या कोरोनासारख्या महामारीतून जातो आहोत. कोरोनावर अद्याप लस सापडली नाही. त्यामुळे सध्यातरी त्यासाठी घेण्यात येणारी काळजी हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे. गेल्या आठवड्यात मला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतरच्या माझ्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने मी कोरोनाला पराजित करू शकलो आहे. यासाठी काटेकोरपणे क्वारंटाइनचे पालन, योग्य आहार, पुरेसा व्यायाम, काही औषधे व सकारात्मक विचार ही पंचसूत्री मी अवलंबली. या काळात मला कुटुंबाने, वरिष्ठांनी, मित्रांनी व मालेगावकरांनी धीर दिला हेसुद्धा माझ्यासाठी मोठे औषधच ठरले. 

श्री कासार म्हणाले, मी बरा झालो असलो तरी मला याचे विशेष समाधान नाही, कारण जेव्हा संपूर्ण मालेगाव कोरोनामुक्त होईल त्या दिवशी मला अत्यानंद झालेला असेल. शहरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. मला वाटते आपण सर्वांनी माझ्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन केले, पुरेशी काळजी घेतली तर आपण सगळे जण शंभर टक्के या आजारावर मात करू. या आजाराचा संसर्ग टाळू शकू. आपण जर पुरेशी काळजी घेतली नाही तर आपली बेफिकिरी आपल्या, कुटुंबाच्या, जवळील मित्रांच्या, शेजाऱ्याच्या जिवावर बेतू शकते. जे आपले जीव की प्राण आहेत, ज्यांच्यासाठी आपण कष्ट करतो अशा जिवाभावाच्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आपल्या सगळ्यांना काही दिवस काळजी घ्यावीच लागणार आहे. आजार झाल्यावर होणारा त्रास व संभाव्य धोक्‍यापेक्षा काळजी घेणे अगदीच सोपे आहे. डॉक्‍टर, नर्सेस, पोलिस, आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह आम्ही कितीही प्रामाणिकपणे व जीव धोक्‍यात घालून मेहनत घेतली तरी आपल्या सहकार्याशिवाय आपण कोरोनाला हद्दपार करू शकणार नाही. 
.... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख