नाशिक : त्र्यंबकेश्वर शहरातील अतिक्रमणांबाबत चंद्रकांत पाठक या नागरिकाने नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अपर जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी यांच्यासह सर्व १८ नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या गुरुवारी (ता. २०) त्याची सुनावणी होणार आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून, यात अनेक नगरसेवकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकांनी अतिक्रमणांना पाठबळ दिले आहे. नगरसेवकांच्या अतिक्रमणाविरोधात पाच ते सहा वर्षांपासून श्री. पाठक तक्रारी करीत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याची तक्रार करीत त्यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, त्यांच्या अतिक्रमण असलेल्या नगरसेवकांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी येत्या गुरुवारी (ता. २०) सुनावणी होणार आहे.
अपर जिल्हाधिकारी सुनावणी घेणार असून, नुकत्याच सगळ्यांना सुनावणीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात नगराध्यक्ष लोहगावकर, नगरसेवक कौलास चोथे, भारती बदादे, विष्णू दोबाडे, सायली शिखरे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे, दीपक गिते, अनिता बागूल, स्वप्नील शेलार, सागर उजे, माधवी भुजंग, शीतल उगले, संगीता भांगरे, शिल्पा नारायणे, समीर पाटणकर, मंगला आराधी यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर शहरातील अतिक्रमणांचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत आहे. सिंहस्थ कुंभमेळा, पुरामुळे शहरात पाणी साचणे यांसारखे तत्कालीन विषय चर्चेत आल्यानंतर हा विषय चर्चेत येतो. त्यानंतर पुन्हा चर्चा विरते. याप्रकरणी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ कलम ४४ नुसार अतिक्रमण असलेल्या नगरसेवकांना कायमस्वरूपी अपात्र ठरविले जावे, अशी पाठक यांची मागणी आहे.
...
https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

