Chhagan Bhujbal take a Ramjanmbhoomi agitation before BJP in 1987 | Sarkarnama

माहितीये का? "भाजप'आधी छगन भुजबळांनी केले होते "रामजन्मभूमी आंदोलन' 

संपत देवगिरे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

राजकीय कोंडी झाल्याने भाजपने 1990 मध्ये रामजन्मभूमी आंदोलन हाती घेतले. मात्र त्यांच्याही आधी राज्याचे फायरब्रॅंड नेते छगन भुजबळ यांनी 1987 मध्ये नाशिकला "रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन केले होते. 

नाशिक : राजकीय कोंडी झाल्याने भाजपने 1990 मध्ये रामजन्मभूमी आंदोलन हाती घेतले. मात्र त्यांच्याही आधी राज्याचे फायरब्रॅंड नेते छगन भुजबळ यांनी 1987 मध्ये नाशिकला "रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन केले होते. शिवसेनेतर्फे झालेल्या या आंदोलनात भुजबळांसह शिवसेनेच्या कडव्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या काठ्याही अंगावर झेलल्या होत्या. विशेष म्हणजे तेव्हा राज्यात भाजप शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होता. अगदी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही याची पुसटशी माहितीदेखील नाही. 

श्री. भुजबळ शिवसेनेचे मुंबईचे महापौर झाले. यादरम्यान 1985 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या वेळी छगन भुजबळ शिवसेनेतर्फे माझगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तेव्हा ते विधानसभेतील शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्यानंतर महिन्याभरात महापौर निवडणूक झाली. त्यात महापौर झाले. महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहात्सव ते नाशिकला ये-जा करू लागले. शिवसेनेच्या विस्तारासाठी त्या वेळी खूप धडपड होत असे. पेठसह विविध आदिवासी भागात त्यांनी शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या होत्या. यादरम्यान कार्यकर्ते, पदाधिकारी चर्चेसाठी भुजबळ यांच्या चंद्राई (आत्ताचे भुजबळ फार्म) बंगल्यावर बैठका होत. त्या वेळी नाशिककरांना भुजबळ कोण, हे कळू लागले होते. मात्र पेठ, सुरगाणा या आदिवासी, ग्रामीण भागात प्रसिद्धिमाध्यमे नसल्याने ते भुजबळ फारसे परिचित नव्हते, असे लोक सांगतात. 

या वेळी श्री. भुजबळ यांनी हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष रमेशशेठ भोरे (पुढे ते महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक झाले.) आणि उत्तमराव ऊर्फ मामा तांबे यांच्याशी चर्चा करून गुडीपाढव्याला अयोध्येतील मंदिर खुले होण्यासाठी श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलन करण्याचे ठरले. याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यांनी पोलिसांचा मोठा फौजफाटा व राज्य राखीव दलाचे जवान मालेगाव स्टॅंड भागात तैनात केले. ठरल्याप्रमाणे श्री. भुजबळ आंदोलनासाठी आले. त्यांना श्री. तांबे यांनी श्रीरामाचा एक फोटो दिला. हा फोटो श्री. भुजबळ यांनी गळ्यात घातला. श्री. भोरे, तांबे, अण्णा लकडे, वि. ना. सोलापूरकर, रामसिंग बावरी, दादा बोरसे यांसह विविध शिवसेना कार्यकर्ते व श्री. भुजबळ घोषणा देत निघाले. खरेतर आंदोलन सरदार चौकातून होणार होते. मात्र त्याची सुरवात रविवार कारंजापासूनच झाली. त्यांना मालेगाव स्टॅंडवर पोलिसांनी अडविले. त्यांना काठ्यांनी मारत माघारी वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात काही शिवसेना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मध्यवर्ती बसस्थानकामागे असलेल्या लॉकअपमध्ये ठेवले. उर्वरित कार्यकर्ते उमा महेश्‍वर गल्लीने निघून गेले. पोलिसांना वाटले, आंदोलन संपले. मात्र श्री. भुजबळ यांनी ठरल्याप्रमाणे सरदार चौकातून आंदोलन सुरू केले. नागरिकांनी त्यांचे चांगले स्वागत केले. काळाराम मंदिर, पंचवटी कारंजामार्गे ही मंडळी पुन्हा घोषणा देत मालेगाव स्टॅंडवर आली तेव्हा पोलिसांची चांगलीच फजिती झाली. अशा प्रकारे नाशिकमध्ये रामजन्मभूमी आंदोलन झाले. या आंदोलनाच्या बातम्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे झळकल्या. 

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली भाजप 
शरद पवार तेव्हा समाजवादी कॉंग्रेस (अर्थात एस. कॉंग्रेस)चे नेते होते. भाजप श्री. पवार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक छोटा घटक होता. या वेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 आमदार श्री. पवार यांच्या आघाडीकडे होते. त्यात भिकचंद दोदे (देवळाली), डी. एस. आहेर (नाशिक) व जयचंद कासलीवा (चांदवड) असे तीन भाजप आमदार शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते.. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख