नाशिक : नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहगे. मात्र त्याला अटकाव करुन त्याची साखळी खंडीत करण्याबाबत आम्हाला आता स्थितीचा अंदाज आला आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा मनापासून झटत आहेत. सामान्य नागरीकांचे त्यात खुप सहकार्य आहे. रुग्णालये, सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आम्ही पुढे जात राहू. लवकरच कोरोनाला शहरातून हद्दपार केलेले दिसेल, असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
कोरोनाचा वाढता संसर्ग व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी काल ज्येष्ठ नेते शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, टास्क फोर्सचे प्रमुख डॅा सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत काल नाशिकला बैठक झाली. यावेळी त्यांनी बैठकीत कोरोनाविषयक उपाययोजनेची माहिती दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, सुरुवातीला राज्यात इतर महानगरांमध्ये कोरोना संसर्गितांची संख्या वाढत होती त्यावेळी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नव्हता. परंतू पहिले लॉकडाउन संपल्यानंतर संसर्गितांची संख्या कमालीची वाढली. सुरुवातीला सुरु झालेला अनभिज्ञतेचा प्रवास अनुभवाअंती योग्य दिशेने जातांना दिसतो आहे. त्यातूनच आपण मालेगांवची लढाई जिंकली आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण रुग्ण बरे करण्याबरोबरच त्यांचा मृत्यूदर शुन्यावर आणण्याचे लक्ष शासनाने निश्चित केले आहे. लॉकडाउन करण्याची आवश्यकता नाही कारण ज्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाउन झाले त्या जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे दिसून आलेले नाही. अशा प्रकारच्या अनुभवातून परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण पुढे जात राहू आणि कोरोनावर मात करु असा आशावाद पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त करुन जिल्ह्यात खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विनंतीवरुन आढावा घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे डॉ.सुधाकर शिंदे उपस्थित होते.
.....
https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

