नाशिक : डॉ. जयंत नारळीकर यांनी पाच दशकाहून अधिक काळ आपल्या लेखनाने वाचकांना जगाचेच नव्हे, तर ब्रह्मांडाचे ज्ञान दिले. विज्ञानात साक्षर करणारी, माहिती देणारी असंख्य पुस्तके असतात. परंतु विज्ञानाला मानवी जगण्याचे नवे तत्व देऊन वैचारिक दिशा देण्याचे महत्वाचे काम त्यांनी आपल्या साहित्याने केले आहे.
असा विज्ञानवादी साहित्यिक संमेलनाला अध्यक्ष लाभल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य विचाराला नवा आयाम देणारे ठरेल, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगलाताई नारळीकर, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, दिलीप साळवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुजबळ यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर पोहोचलेल्या मराठी साहित्याच्या एकुण प्रवासात विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून महाराष्ट्राचीच नव्हे, तर जगातील तमाम मराठी भाषिकांच्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनलेल्या साहित्य संमेलनांचा खळाळता प्रवाह आजतागायत अखंड सुरू आहे. आजवर झालेल्या साहित्य संमेलनांना लाभलेल्या अध्यक्षांच्या प्रतिभेने हा प्रवाह समृद्ध होत गेला. कविता, कादंबरी, नाटके, ललित, समीक्षा, प्रकाशने, संपादने यासह जगण्यातील सुखदुःखाचे असंख्य भावस्पर्शी पदर उलगडणाऱ्या या प्रवाहाने मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले आहे.
ते म्हणाले की, या सर्व भावभावनांच्या पलिकडे जाऊन विज्ञानातील अद्भुत रहस्ये, मूलभूत तत्वे आणि त्याचा मानवी जगण्याशी असलेला कमालीचा उत्कट संबंध मराठी साहित्य प्रांतात नारळीकरांनी अफाट क्षमतेने मांडला. मराठी साहित्याला एक सशक्त व काळाच्या पुढची विलक्षण लखलखीत दिशा देण्याचे काम आपल्या लेखनाने त्यांनी केले आहे. सुमारे पाच दशकाहून अधिक काळ आपल्या लेखनाने मराठी वाचकांना केवळ जगाचेच नव्हे, तर ब्रह्मांडाचे ज्ञान त्यांनी दिले. विज्ञान साक्षर करणारी, माहिती देणारी असंख्य पुस्तके असतात. परंतु विज्ञानाला मानवी जगण्याचे नवे तत्व देऊन वाचकांना वैचारिक दिशा देण्याचे महत्वाचे काम आपल्या साहित्याने त्यांनी केले आहे. आम्हास हा अतीशय उचित गौरव वाटतो आहे. आपणासारखा वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक अध्यक्ष म्हणून लाभल्याने हे साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला अतिशय नवा आयाम देणारे ठरेल. आम्ही सर्व नाशिककर आपल्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहोत.
....

