छगन भुजबळ कोरोनाग्रस्त; साहित्य संमेलनाचे काय होणार ? - Chhagan Bhujbal founf covid-19 Possitive. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

छगन भुजबळ कोरोनाग्रस्त; साहित्य संमेलनाचे काय होणार ?

संपत देवगिरे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काल सायंकाळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त होणारे ते सातवे मंत्री आहेत. त्याचा परिणाम साहित्य संमेलनाच्या तयारीवर होऊ शकतो.

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काल सायंकाळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त होणारे ते सातवे मंत्री आहेत. त्याचा परिणाम साहित्य संमेलनाच्या तयारीवर होऊ शकतो.

दरम्यान श्री. भुजबळ नाशिक येथे होणा-या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाच्या तयारी संदर्भात ते सातत्याने बैठका व तयारीसाठी कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. या धावपळीत त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने गेल्या दोन तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते, नागरिकांनी आपली चाचणी करुन घ्यावी. तसेच संपर्कातील सहका-यांनीही दक्षता घ्यावी, असे पत्रक त्यांच्या कार्यालयाने काढले आहे. 

येथील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात येत्या 25 ते 28 मार्च दरम्यान साहित्य संमेलन होत आहे. श्री. भुजबळ यांचा या संमेलनाच्या आयोजनात महत्वाची भूमिका आहे. ते स्वतः स्वागताध्यक्ष आहेत. ते कोरोनाग्रस्त झाल्याने पुढील  चौदा दिवस त्यांना गृहविलगीकरणात रहावे लागेल. या कालावधीत वैद्यकीय कर्मचारी वगळता शक्यतो अन्य नागरिकांच्या संपर्कात येता येणार नाही. सध्या साहित्य संमेलनाची तयारी वेगात आहे. महत्वाचे नियोजन केले जात आहे. यासंदर्भात काल दोन बैठका झाल्या होत्या. दररोज यासंदर्भात साहित्य महामंडळ व स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा, बैठकांचा धडाका आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे यावर मर्यादा येणार असल्याने साहित्य संमेलनाच्या नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः विविध शासकीय अधिकारी व सहका-यांच्या समित्या त्यांनी नेमल्या आहेत. त्याचा आढावा व प्रत्यक्ष कामकाज केस होणार याची चिंता संयोजकांना सतावत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी या कामकाजात लक्ष घातल्याने त्यांच्या जबाबदारीत वाढ होईल.   

नाशिकला यापूर्वी आमदार सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॅा सयाजीराव गायकवाड यांसह विविध लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता पालकमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली. यापूर्वीही त्यांच्या कार्यालयातील चार सहकारी कोरोनाग्रस्त झाल्याने काही काळ त्यांचे मुंबईचे तसेच नाशिकचे कार्यालय बंद करण्यात आले होते. आता पालकमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे. 
....  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख