Chhagan Bhujbal and Dada Bhuse both ministers constituency now corona free | Sarkarnama

छगन भुजबळ, दादा भुसे दोन्ही मंत्र्यांची गावे झाली कोरोनामुक्त!

संपत देवगिरे
गुरुवार, 21 मे 2020

येवला हा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. दाभाडी हा कृषीमंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. ही दोन्ही गावे काल कोरोनामुक्त झाली. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले. 

नाशिक : जिल्ह्यात ग्रामीण भगातील सर्वाधीक कोरोना बाधीत रुग्ण असलेले येवला हा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. तर दाभाडी हा कृषीमंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. दोन्हींचे कोरोना कनेक्‍शन मालेगावशी होते. मात्र ही दोन्ही गावे काल कोरोनामुक्त झाली. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले. दाभाडी येथे तर एकमेव रुग्णाचा अहवाल देखील निगेटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. 

आरोग्य विभागासह सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध गाव, तालुके आणि शहरे कोरोनापासून मुक्त होण्यास सुरवात झाली आहे. बुधवारी येवला, दाभाडी आणि ओझर ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोठी शहरे कोरोनामुक्त झाली. बागलाण तालुक्‍याचीही कोरानामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्‍यातील केवळ एकाचा अहवाल प्रलंबित आहे. यामुळे जिल्ह्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. येवल्यात कोरोनाबाधितांची संख्या ३२ वर पोचली होती. मालेगाव व नाशिकनंतर हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा आकडा होता. पालकमंत्री, आमदार, रुग्णांसह नागरिक आणि प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीला यश आले.

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

बाभूळगाव येथील उपचार केंद्रातील शेवटच्या रुग्णालाही बुधवारी घरी सोडल्याने रुग्णसंख्या शून्य झाली आहे. आता फक्त नाशिकला तिघे उपचार घेत असून, तेही ठणठणीत असल्याने त्यांना आज घरी सोडणार आहेत. त्यामुळे येवला पॅटर्न चर्चेत असून, त्याचा आनंद समस्त तालुकावासीयांना आहे. लॉकडाउननंतर तब्बल महिनाभराने येवल्यात २४ एप्रिलला मालेगाव कनेक्‍शनमुळे कोरोनाचा पहिला रुग्ण 
आढळला होता. धाकधूक वाढत असताना एकदा ६८, तर दुसऱ्यांना ६४ संशयित एकाचवेळी निगेटिव्ह आल्याने संपर्क साखळी तुटण्यास मोठी मदत झाली. गेल्या आठवड्यापासून तर येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने तालुक्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे. 

दाभाडीत आनंद 
दाभाडी गावातील नागरीकांनी अठरा दिवस तणावाखाली काढले. मात्र गावातील चौदाही कोरोना रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. गाव कोरोनामुक्त झाल्याने ग्रामस्थांसह संपूर्ण यंत्रणेने सुटकेचा निःश्‍वास सोडताच गावात आनंदाची लहर उमटली आहे. एकही रुग्ण न दगावता गाव कोरोनामुक्त झाल्याने कार्यरत यंत्रणेचे कौतुक होत आहे. २ मेस दाभाडीत पहिला रुग्ण आढळल्याने परिसरात घबराट पसरून रुग्णांची संख्या वाढत १४ पर्यंत पोचली. उपचारासाठी गावाबाहेर (कै.) इंदूबाई हिरे वसतिगृहात ताप उपचार केंद्रात विलगीकरण विभाग स्थापन करण्यात आले होते. तेथे अद्ययावत सुविधा असल्याने रुग्णांना वेळीच उपचार मिळाले. 
... 
येवला तालुक्‍यात कोरोनाचे जवळपास ३२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी २९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, उर्वरित तीन नागरिकांना गुरुवारी डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे येवला तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. प्रशासनाने केलेले नियोजन आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यातून हे शक्‍य झाले आहे. 
- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख