Cheating of farmers in this center of Cotton Corporation | Sarkarnama

कापूस महामंडळाच्या या केंद्रात शेतकऱ्यांची लूट   

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

संबंधित केंद्रातील कारभाराबाबत तक्रार केली आहे. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘सीसीआय’च्या केंद्रात दर्जेदार कापसाची विक्री केली.

जळगाव : एक क्विंटल कापसामागे चार किलो कापसाची कटती (घट) लावण्याचा प्रकार जळगावसाठी नियुक्त केलेल्या कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रात होत आहे. यासंदर्भात शेतकरी नितीन पाटील (भादली खुर्द, ता.जळगाव) यांनी संबंधित केंद्रातील कारभाराबाबत तक्रार केली आहे. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘सीसीआय’च्या केंद्रात दर्जेदार कापसाची विक्री केली. त्यांनी ४१ क्विंटल ७८ किलो कापूस ट्रॅक्‍टरमध्ये विक्रीसाठी आणला होता. त्याची तोलाई झाल्यानंतर ट्रॅक्‍टर रिकामे करण्यात आले. तोलाईसाठी सुमारे २२० रुपये आकारले. ट्रॅक्‍टर रिकामे करण्याच्या भागात हमाल किंवा मजूर खुशाली (चहापाणीसाठी पैसे) अडून बसले. पैसे दिले तरच ट्रॅक्‍टर रिकामे करू, अशी अडवणूक तेथे झाली. तेथे २०० रुपये द्यावे लागले.

कारखाना चालकाकडून स्वतः कटती

रिकामे ट्रॅक्‍टर पुन्हा तोलकाट्यावर तोलाईसाठी आले. तोलकाट्यावर कटती लावण्यासाठी तोलकाट्यावर स्वतः जिनींग प्रेसिंग कारखान्याचे मालक उभे राहिले. संबंधित मालक राजकीय व्यक्ती असल्याने व कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यासमोर दुसरे पर्याय नसल्याने हा प्रकार बिनबोभाट सुरू राहिला. कापूस ४१ क्विंटल ७८ किलो होता. परंतु, तो फक्त ४० क्विंटल आठ किलो एवढाच असल्याचे तोलकाट्याच्या पावतीवर नमूद करण्यात आले. अर्थातच एक क्विंटल ६० किलो कापसावर संबंधित कारखानाचालकाने डल्ला मारला, असे शेतकरी नितीन म्हणाले. रिकाम्या ट्रॅक्‍टरची तोलाई झाल्यानंतर हे ट्रॅक्‍टर थांबवून ठेवण्यात आले. मग २० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे हमालीचे पैसे द्यावे लागले. खुशाली, तोलकाट्यावरील तोलाई व नंतर हमाली यासंबंधी जे पैसे दिले, त्यापोटी कुठलीही पावती मिळाली नाही. हा लुटीचा प्रकार असल्याचे शेतकरी पाटील म्हणाले.

१० हजार रुपयांची लूट 

एक क्विंटल ६० किलो कापसाची कटती (घट) लावून लूट केली. यापोटी ५३३५ रुपये प्रतिक्विंटल या दरानुसार आठ हजार ५३६ रुपयांची लूट झाली. तर, हमाली, तोलाई, खुशालीपोटी सुमारे ९०० रुपयांची लूट झाली. अर्थातच किमान १० हजार रुपयांची लूट झाली, असा दावा शेतकरी नितीन यांनी केला. हा प्रकार ‘सीसीआय’चे अधिकारी व केंद्रचालक यांची मिलिभगत असल्याशिवाय होवू शकत नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

‘सीसीआय’चे केंद्र असलेल्या कारखान्यात  प्रकार

कटती, हमाली, तोलाई, खुशालीसंबंधी ‘सीसीआय’च्या निर्देशित केंद्रात कुठलेही लेखी आदेश शासन, वस्त्रोद्योग विभागाने दिलेले नसल्याचे ‘अॅग्रोवन’ने केलेल्या संशोधनानंतर समोर आले आहे. ‘सीसीआय’कडे स्वतःच्या मालकीचे जिनींग प्रेसिंग कारखाने नाहीत. कापूस खरेदी केंद्र सीसीआय खासगी कारखान्यात सुरू करते. या कारखान्यात खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रिया केली जाते. रुई व सरकी वेगळी केली जाते. या सर्व प्रक्रियेसंबंधी लागणाऱ्या खर्चापोटी प्रतिगाठ (एक गाठ १७० किलो) ९०० रुपये कारखाना मालकास दिले जातात. या मोबदल्यामध्ये कापसाची हाताळणी, तोलाई, हमाली आदी सर्व खर्च समाविष्ट असतो. कटती लावणे तर बेकायदेशीर आहे. अर्थातच, ‘सीसीआय’चे केंद्र असलेल्या कारखान्यात हमाली, तोलाई, खुशाली, कटतीपोटी जो प्रकार सुरू आहे, तो बेकायदेशीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख