केंद्र सरकार आंदोलनकर्ते शेतक-यांचा छळ करीत आहे? - central Government brutal towards Farmers agitation. Farmers Politics | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्र सरकार आंदोलनकर्ते शेतक-यांचा छळ करीत आहे?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शेतकरी नेत्यांचा छळ सुरु आहे. 

नाशिक : शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या वतीने देशभर चक्का जाम करण्याची हाक देण्यात आली होती. या संदर्भात शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी व शेतकरी आंदोलनला पाठिंब्यासाठी निफाडला चांदोरी चौफुली येथे चक्काजाम धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर, किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, शिवाजी राजे मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.  नाशिक औरंगाबाद महामार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  

यावेळी श्री. गायकर म्हणाले, दिल्ली येथील शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करीत आहे. सरकारने आंदोलन सुरु असलेल्या मुख्य चारही स्थळांवर प्रचंड पोलीस बल तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांचा छळ सुरु आहे. 

ते म्हणाले, आंदोलनस्थळी जाणा-या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठादेखील खंडित केला जात आहे. काही पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करत आहेत. सरकार करीत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे. सरकारच्या या दडपशाहीचा प्रत्येकाने धिक्कार केला पाहिजे. 
 
राजू देसले यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व अन्यायकारक असे तीन शेजारी कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर रास्ता रोको व चक्काजाम केले आहे. त्यात आम्ही सहभागी झालो. निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. महिला आणि वारकरी संप्रदाय ने भजन करून शेतकरी आंदोलनात भाग घेतला. 
या आंदोलनात शिवा तेलंग, उमेश शिंदे, संतोष माळोदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, वंदना कोल्हे, जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, आशिष हिरे, किरण बोरसे, उत्तम कापसे, अविनाश गायकर, मनोहर मुसळे, सागर पवार, सुषमा बोरसे, निफाड तालुका अध्यक्ष सतीश नवले आदी सहभागी झाले. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख