नाशिक : बूथप्रमुख हा पक्षाचा कणा आहे. त्यांच्या माध्यमातून पक्षाची धोरणे आणि कामे खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोचतात, असे मत नंदुरबारच्या खासदार आणि बूथ संपर्क अभियानाच्या नाशिक प्रभारी डॉ. हीना गावित यांनी डीजीपीनगर येथे व्यक्त केले. द्वारका मंडल बूथ संपर्क अभियान बैठकीत त्या बोलत होत्या.
भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात बूथ स्तरीय यंत्रणेची संघटनात्मक बांधनी सुरु आहे. त्यासाठी खासदार गावित यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी डॉ. गाविता म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे व जनहिताची कामे विविध स्तरावर सुरु आहेत. त्यामुळे देशात व राज्यात या पक्षावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. आगामी काळात विविध प्रतिस्पर्धी भाजप विरोधात राजकीय षडयंत्र करुन जनतेचा बुद्धीभेद करण्याची शक्यता आहे. त्यांना चोख उत्तर देण्यासाठी कार्यकर्ते जागरुक असले पाहिजेत. त्यासाठी बूथ स्तरीय यंत्रणा मजबूत व जागरुक असली तर कोणीही कोणत्याही निवडणूकीत भाजपचा पराभव करु शकणार नाही.
त्या पुढे म्हणाल्या, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार काम करीत आहेत. त्यांनी आखलेले कार्यक्रम व जनहिताच्या योजनांमुळे देशाची वाटचाल विकासाकडे होत आहे. त्याला कोणीही आव्हान देईल अशी स्थिती नाही. विरोधी पक्ष त्यांचा सामना करू शकत नसल्याने ते विविध अडथळे निर्माण करुन या सरकारपुढे अडचणी आणतात. मात्र देशात भाजपच्या केंद्र सरकारला पर्याय नाही.
यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, सभागृहनेते सतीश सोनवणे, पूर्व विभाग सभापती श्याम बडोदे, नगरसेवक प्रशांत जाधव, मध्य विधानसभा प्रभारी पवन भगूरकर, प्रभारी रामहरी संभेराव, मंडल अध्यक्ष सुनील देसाई आदी उपस्थित होते.
...

