भाजपमधील काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये... - BJP workers from Dhule district join NCP  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमधील काही पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबई : उत्तरमहाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर भाजपमधील अनके पदाधिकारी कार्यक्रते हे राष्ट्रवादीमध्ये जाणार असे सांगण्यात येत होते. यानंतर आज धुळे जिल्ह्यातील भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने याची सुरवात झाली असल्याची चर्चा आहे. 

मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. धुळे जिल्ह्यातील भाजपचे भरत पाटील, भास्कर पाटील, अनंतराव पाटील, बाळू पाटील, कपिल दामोदर, माजी संस्थापक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहर उपाध्यक्ष दिलीप पाटील, राजेंद्र गायकवाड यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, धुळे शहराध्यक्ष विजय वाघ, संयोजक प्रशांत भदाणे उपस्थित होते. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात जे एकनाथ खडसे यांना मानणारे कार्यक्रते आहेत, ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहे. 

खडसे यांच्या बरोबर काही आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील काही आमदारांवर भाजप कडून ‘वॉच' ठेवला जात असल्याचे बोलले जाते. एकनाथ खडसे सोबत एकही आमदाराने जाऊ नये, यासाठी फिल्डींग लावली जात असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने खाजगीत सांगितले होते.  

खडसे यांच्यानंतर कोण कोण जाणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. नाशिकमध्ये खडसे समर्थक आमदार कोण ? याचा शोध घेतला जात आहे. आमदारांवर कार्यकर्त्यांकडून नजर ठेवली जात आहे. आमदारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना प्रादुर्भावापुर्वी शहरातील भाजपच्या एका आमदाराने खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील फार्म हाऊसवर भेट घेतली होती. त्यातूनच आमदारांच्या नजरकैदेचा मुद्दा समोर आला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख