`भाजप`ची झोप उडाली... सुरु केली नगरसेवकांची झाडाझडती! - BJP Will Take review of Councilers Devolopment Work | Politics Marathi News - Sarkarnama

`भाजप`ची झोप उडाली... सुरु केली नगरसेवकांची झाडाझडती!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

सर्व नगरसेवकांना विकासकामांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या कामकाजाला गती देण्यासाठी आढावा घेण्याचे काम सुरु केल्याचे नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

नाशिक : स्वबळावर महापालिकेत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. महापालिका निवडणूकीची चाहूल लागल्याने कालवर सत्तेच्या मखमली पदावर विराजमान झालेले पदाधिकारी सक्रीय होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व नगरसेवकांना विकासकामांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आता हा उपाय नगरसेवक आणि नागरिकांच्या कितपत पचनी पडतो हे पहावे लागेल.

महापालिका निवडणुकीला दीड वर्ष शिल्लक राहिले असताना सत्ताधारी भाजपकडून नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. साडेतीन वर्षांत नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये केलेली कामांचा आढावा प्रगतिपुस्तकाच्या माध्यमातून मांडून दिशा ठरविण्यासाठी नगरसेवकांची बैठक घेतली जात आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्व नगरसेवकांच्या कामांचा आढावा घेऊन कामे पूर्णत्वास नेताना येणाऱ्या अडचणी, तसेच प्रस्तावित कामांची माहिती घेतली जात आहे.

महापालिकेत २०१७ मध्ये प्रथमच भाजपची बहुमताने सत्ता आली. निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा केल्यानंतर बहुमतापलीकडे भाजपचे सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन होऊन साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला. २०२१ मध्ये महापालिकेची निवडणूक होणार असली तरी जानेवारीतच निवडणुकीची अधिसूचना निघणार असल्याने नगरसेवकांच्या हाती फक्त चौदा महिने शिल्लक आहेत. त्यामुळे भाजपने पुन्हा बहुमताने निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. बहुतांश वेळा पाच वर्षे पूर्ण होत असतानाच नगरसेवकांच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. परंतु भाजपने दीड वर्षे शिल्लक असतानाच नगरसेवकांच्या प्रगतीचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. या माध्यमातून नगरसेवकांना कामे पूर्णत्वास नेण्याच्या अडचणी दूर करून दीड वर्षात विकासकामांना गती देण्याचा भाग मानला जात आहे.

नगरसेवकांच्या कामांना गती
सत्तेच्या पाच वर्षांपैकी साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात नगरसेवकांच्या कामांवर त्यांनी फुली मारल्याने नऊ महिने, त्यानंतर मार्च ते ऑक्टोबर या सात महिन्यांत लॉकडाउनमुळे वाया गेल्याची भावना नगरसेवकांमध्ये आहे. सत्तेची पहिली दोन वर्षे पक्षांतर्गत वादामुळे नगरसेवकांमध्ये गट पडल्याने त्याचा परिणाम पक्षाची प्रतिमा मलीन होण्यात झाला. त्यामुळे पुढील दीड वर्षात विकासकामांना गती देण्यासाठी कृतिआराखडा आखला जात आहे. महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे व भाजप गटनेते जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक घेतली जात आहे. नगरसेवक निधीबरोबरच केंद्र सरकारचे प्रकल्प नाशिकमध्ये राबविण्यासंदर्भात आढावा घेतला जात आहे.
...
विकासकामांबाबत भाजपचे पदाधिकारी काय करतात व कामांना गती देण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली जात आहे.
-सतीश कुलकर्णी, महापौर 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख