खडसे इफेक्ट; भाजप जळगावच्या स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेणार - BJP Will take Nominated Corporators Resignation | Politics Marathi News - Sarkarnama

खडसे इफेक्ट; भाजप जळगावच्या स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेणार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आता जिल्ह्यात ‘अॅक्शन मोड’मध्ये आला आहे. जळगाव शहरातही पक्षाच्या बळकटीची नवीन रचना करण्यात येत असून, त्याची सुरवात महापालिकेपासून करण्यात येणार आहे.

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आता जिल्ह्यात ‘अॅक्शन मोड’मध्ये आला आहे. जळगाव शहरातही पक्षाच्या बळकटीची नवीन रचना करण्यात येत असून, त्याची सुरवात महापालिकेपासून करण्यात येणार आहे.

महापालिकेतील चार स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात येत असून, त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. उपमहापौरपदासाठी चार जण इच्छुक असून, त्यांच्या नावाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. 

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रवेशानंतर भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात सतर्क झाला आहे. पक्षाचे प्रदेश संघटक विजय पुराणिक यांनी जळगावात तब्बल चार दिवस मुक्काम ठोकून जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका घेतल्या. या वेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी पालकमंत्री गिरीश महाजनही होते. त्यांनीही काही तालुक्यांत बैठकीला उपस्थिती दिली. खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रवेशानंतर जळगाव शहरातही पक्षबळकटीसाठी प्रयत्न करण्याची गरज दिसून आली. त्या पार्श्वभूमीवर सत्ता असलेल्या महापालिकेपासून सुरवात करण्यात येणार आहे. महापालिकेत आता काही नव्यांना पदाची संधी देण्यात येणार आहे. त्याची सुरवात स्थायी समिती सभापतिपदापासून झाली आहे. राजेंद घुगे-पाटील यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली. 

उपमहापौरपदासाठी चौघे इच्छुक 
महापालिकेचे उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या पदासाठी आता पक्षातर्फे नगरसेवक सुनील खडके, दत्तू कोळी, चेतन सनकत आणि  दिलीप पोकळे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यातही आता कालावधीचा घोळ निर्माण झाला आहे. महापौर व उपमहापौरपदाबाबत एक वर्षाचा कालावधी ठरला होता. मात्र आता उपमहापौर डॉ. सोनवणे यांनी उशिरा राजीनामा दिल्यामुळे नवीन नियुक्त होणाऱ्या महापौरांना केवळ सहा महिनेच कालावधी मिळणार आहे. कारण मुदत संपल्यानंतर महापौर व उपमहापौर दोघांना राजीनामे द्यावे लागणार आहेत. अशा स्थितीत पुढील कालावधीत वाढवून देऊन पुन्हा एक वर्षासाठी याच उपमहापौरांना संधी दिली जाणार की केवळ सहा महिनेच संधी मिळणार यावर आता चर्चा सुरू आहे. 

स्वीकृत नगरसेवकही बदलणार 
महापालिकेत भाजपतर्फे स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी केवळ एक वर्षासाठी निश्‍चित करण्यात आला होता. त्याऐवजी नवीन चार कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र वर्षाचा कालावधी झाल्यानंतरही ही प्रक्रिया झाली नाही. मात्र आता पक्षाने या चारही नगरसेवकांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी चार नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यःस्थितीत असलेले कैलास सोनवणे, विशाला त्रिपाठी, राजू मराठे व महेश चौधरी या नगरसेवकांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
...
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेतील भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात येतील. त्यांच्या जागी नवीन चार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. या चार नगरसेवकपदांबाबत तसेच उपमहापौरपदाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील.

- दीपक सूर्यवंशी, शहराध्यक्ष,जळगाव. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख