शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या घरी अलिबागला आंदोलन करू! - BJP Warns Agitation for Sugarcane delayed payment against Jayant Patil, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या घरी अलिबागला आंदोलन करू!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 14 जून 2021

‘शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जतन केलेला ऊस मोठ्या विश्वासाने रावळगाव कारखान्याला दिला. कारखाना फायद्यात चालवायचा की तोट्यात, ही सर्वस्वी मालक म्हणून तुमची जबाबदारी होती. कोट्यवधींची कष्टाची कमाई तुमच्याकडे थकल्याने आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आम्ही सर्व शेतकरी अलिबागला येऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.

चाळीसगाव : ‘शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जतन केलेला ऊस मोठ्या विश्वासाने रावळगाव कारखान्याला दिला. कारखाना फायद्यात चालवायचा की तोट्यात, ही सर्वस्वी मालक म्हणून तुमची जबाबदारी होती. कोट्यवधींची कष्टाची कमाई तुमच्याकडे थकल्याने आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आम्ही सर्व शेतकरी अलिबागला येऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.

ते म्हणाले, मी शेतकऱ्यांचा प्रश्नांसाठी जेल भोगून आलेला आमदार आहे. शेतकऱ्यांसाठी कुठलीही किंमत मोजायला मी तयार असतो. तेव्हा शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता, दिलेल्या शब्दाला जागा; अन्यथा आम्ही सर्व शेतकरी अलिबागला येऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

रावळगाव येथील एस. जे. शुगर्स कारखान्याला तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे, अशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत त्यांच्या उसाचे पैसे मिळालेले नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार चव्हाण यांच्या अंत्योदय कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते.

शेतकरी व मुकादम यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर आमदार चव्हाण यांनी बैठकीमागील आपली भूमिका मांडली. मागील पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे जवळपास १५ कोटी रुपये घेणे आहेत. ही रक्कम मिळण्यासाठी आपण साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पाठपुरावा केला. कारखान्याचे मालक आमदार जयंत पाटील यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही म्हणून त्यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

त्यावेळी जयंत पाटील यांनी १५ दिवसांत थकीत देयके देण्याचे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांची कुठलीही दिशाभूल होऊ नये, यासाठी उद्या दुर्दैवाने रावळगाव कारखान्याने थकीत देयके देण्यास पुन्हा टाळाटाळ केली तर पुढील दिशा काय असावी, यासाठी विचारविनिमय करण्यासाठी, शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. आंदोलनाच्या माध्यमातून कारखान्यावर दबाव निर्माण करण्यासाठी विधानसभा सदस्य या नात्याने विधिमंडळात, न्यायालयात शेतकऱ्यांतर्फे लढा सुरू ठेवेन, अशी ग्वाही देखील आमदार पाटील यांनी दिली. बैठकीला माळशेवगे, काकळणे, वडगाव, देशमुखवाडी, टाकळी, पिलखोड, नांद्रे, पिंपळवाड निकुंभ, तळोदा प्र. दे., अलवाडी, तमगव्हाणसह भडगाव, नांदगाव, कन्नड, वैजापूर तालुक्यातील जवळपास ३०० ऊस उत्पादक शेतकरी व मुकादमांची उपस्थिती होती.

बैठकीत शेतकरी झाले संतप्त
रावळगाव कारखान्याने उसाचे पेमेंट वेळेत न दिल्यामुळे तालुक्यातील सहकारी संस्थादेखील डबघाईला आल्याचे सांगत अनेक शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. देशमुखवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष किसनराव देशमुख, बहाळ येथील शांताराम पाटील, पातोंड्याचे संजय पाटील, उद्धवराव माळी, शेषराव पाटील, दिनेश बोरसे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. अमोल चव्हाण, दिनेश माळी यांनी संयोजन केले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धवराव माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेषराव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील निकम, पंचायत समितीतील गटनेते संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, पालिकेतील गटनेते संजय रतनसिंग पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, माजी कृषी अधिकारी व्ही. डी. पाटील, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, ऊस उत्पादक शेतकरी किसनराव देशमुख, बापूराव पाटील, डॉ. महेंद्रसिंग राठोड, आबा पाटील, शांताराम पाटील, हरिभाऊ काळे, रोहन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

...

हेही वाचा....

कृषिमंत्री दादा भुसेंनी केली खरीपाची पेरणी !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख