लॉकडाउन वाढविल्यास भाजपचे असहकार आंदोलन

सलग दळणवळण बंदीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली असून, व्यावसायिक उद्रेकी मनःस्थितीत आहेत. तरीही लॉकडाउन वाढविला जात असेल, तर मात्र भारतीय जनता पक्ष जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल, असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला.
Vijay Choudhary
Vijay Choudhary

नंदुरबार : सलग दळणवळण बंदीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली असून, व्यावसायिक उद्रेकी मनःस्थितीत आहेत. तरीही लॉकडाउन वाढविला जात असेल, तर मात्र भारतीय जनता पक्ष जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल, असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला.

भाजप आणि जिल्ह्यातील दुकानदार व व्यावसायिकांकडून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सध्या जिल्ह्यातील कोरोना स्थिती सुधारून रुग्णसंख्या घटली आहे. एप्रिलच्या प्रारंभापासून जे दररोज सरासरी एक हजार २०० रुग्ण आढळू लागले होते आज ते सरासरी २०० वर प्रमाण आहे. आधीपेक्षा बरे होऊन परतणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. तसेच हजारोंच्या संख्येने बेड रिकामे पडले आहेत. एकूणच कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र आहे. तथापि, आधी जिल्हा प्रशासनाने आणि नंतर राज्य शासनाने लॉकडाउन वाढवत नेला. त्यामुळे सलग दीड महिन्यापासून म्हणजे १ एप्रिल ते १५ मेपर्यंतच्या बंदमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे.

वर्षभर आधीपासून बाजारपेठेतील प्रत्येकाची उलाढाल थांबलेली आहे. अशात लॉकडाउन वाढविणार असल्याच्या वृत्ताने सगळे हवालदिल झाले असून, उद्रेकी मनःस्थितीत आहेत. महिनोनमहिने उत्पन्न थांबल्याने प्रत्येक व्यावसायिक तसेच गरीब श्रमिक वर्ग मनाने उद्ध्वस्त झाला आहे. विविध वस्तू, साहित्य आणि पदार्थ हातलॉरीवर विकणारे लहान विक्रेते, छोटे-छोटे दुकानदार, शिलाईकाम करणारे, सलून चालविणारे, लोहारकाम, सुतारकाम करणारे, सौंदर्यप्रसाधने आणि तत्सम गोष्टींची विक्री करणारे छोटे व्यावसायिक व कष्टकरी श्रमिकांवर अक्षरश: उपासमारी आली आहे.

सर्व क्षेत्रांशी संबंधित विक्री करणाऱ्या मोठ्या दुकानदारांना आणि छोट्या व्यावसायिकांना, विक्रेत्यांना तर दरमहिन्याचे वीजबिल, जागेचे भाडे, त्यांच्यावर विसंबलेल्या माणसांचा पगार, बँक-पतपेढ्यांचे हप्ते, होमलोनचे हप्ते कुठून अदा करायचे, असे प्रश्‍न उभे राहिले असून, व्यवसाय बंद असला तरी दरमहिन्याचे खर्च कोणालाही माफ झालेले नाहीत, असे म्हटले आहे. निवेदनावर भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्‍हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा कोशाध्यक्ष कमल ठाकूर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन, ट्रान्स्पोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

....
व्यावसायिकांवर अन्याय
लॉकडाउन हा कोरोना महामारीवरील उपाय वाटण्याऐवजी व्यावसायिकांना संपविणारा व उपासमार घडविणारा घोर अन्याय वाटू लागला आहे. म्हणून १५ मे २०२१ नंतर कोणत्याही कारणास्तव लॉकडाउन वाढविला जाऊ नये, तसेच १५ मेपासून सर्व व्यावसायिकांना सूट देऊन व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अथवा त्यांना दिवसातील सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. व्यावसायिक तसेच नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला असतानाही लॉकडाउन वाढविला जात असेल तर भाजप जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल. तत्कालीन स्थिती पाहून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही दिला आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com