भाजप, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील म्हणतात; वेळा जुळल्या की चहा घेऊ!    - Bjp State Prasidant Chandrakant Patil Criticizes The state Government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

भाजप, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील म्हणतात; वेळा जुळल्या की चहा घेऊ!   

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 जुलै 2021

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आले होते.

नाशिक : ''राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, पदाधिकारी रोज एकमेकांवर आरोप करतात. त्यातून मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर असे सुरु असून तीन पक्षाचे नेते रोज सकाळी कोणी कोणावर आरोप करायचे हे ठरवतात व पुढे गेम सुरु होतो, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी केला. जनता रोजच्या आरोप-प्रत्यारोपांना वैतागली असून निवडणुकांची वाट पाहत असल्याचा दावाही त्यांनी केला. (Bjp State Prasidant Chandrakant Patil Criticizes The state Government)

हेही वाचा : शिवसेनेची खासदार कोल्हेंवर कडवट टीका : सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज वेगवेगळे आरोप करत आहेत. परंतु हे सर्व ठरवून सुरु असते, असे ते म्हणाले. शुक्रवारी (ता.१६) रात्रीपर्यंत ‘ईडी’कडून कोणाला तरी अटक होईल असा दावा पाटील यांनी केला होता. मात्र तसे न झाल्याबद्दल विचारले असता त्यांनी यू-टर्न घेत कोणाला अटक होईल, याचे नाव घेतले नसल्याचे सांगितले. अनेकांची चौकशी सुरु असून, ते अटकेच्या दिशेने आहेत, असा दावाही त्यांनी पुन्हा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी कोणीतरी न्यायालयात गेले आहे. 

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही न्यायालयाने फटकारले असून माजी मंत्री संजय राठोड यांचे देखील एक प्रकरण प्रलंबित आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची चौकशी सुरु असल्याचे दाखले त्यांनी दिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ता सील करण्याची कारवाई ईडीने केली आहे. आर्थिक अनियमितता झाल्याने ही कारवाई आहे. जरंडेश्‍वर साखर कारखान्याच्या निमित्ताने इतर कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केली आहे. यापूर्वी अण्णा हजारे यांनी देखील मागणी केल्याचे पाटील म्हणाले.

वेळा जुळल्या की चहा घेऊ

मनसे व भाजपच्या युतीबाबत पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांची अन्‌ माझी वेळ जुळल्यास सोबत एक कप चहा घ्यायला हरकत नाही. नाशिकमध्ये मनसे-भाजप युती होईल की नाही याबाबत सांगता येणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट नियमित स्वरुपाची आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंदर्भात काही चर्चा झाली असेल असे मला वाटत नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : पहिल्याच भेटीत गृहमंत्री वळसे पाटलांच्या पोलिसांना कानपिचक्या

आषाढीला मुख्यमंत्र्यांनी जावे

आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. त्यांनी तेथे जावे, वारकऱ्यांनीही विरोध करू नये. मात्र
वारकऱ्यांच्या मागण्यांना भाजपचा पाठिंबा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख