भाजप म्हणते, कृषी विधेयकाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल  - Bjp says, Farmers income will be double by new ammendments | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप म्हणते, कृषी विधेयकाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल 

संपत देवगिरे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच कृषी विधेयके तयार केली आहेत. सरकारकडून किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी यापुढेही सुरु राहील.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच कृषी विधेयके तयार केली आहेत. सरकारकडून किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी यापुढेही सुरु राहील. कॉंग्रेससारख्या पक्षांनी या विधेयकांविरोधात सुरु केलेला प्रचार मतलबी आहे. शेतकऱ्यांनी त्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले. 

"भाजपा'तर्फे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 77 हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. "युपीए' सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना आता आपला शेतीमाल कोठेही विकता येणार आहे. यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रिसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून याबाबतचे वाद सोडविताना शेतकऱ्यांचे हित जपले जाईल याला विधेयकात प्राधान्य देण्यात आले आहे. कॉंग्रेसची हरियाणात सत्ता असताना 2007 मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. कॉंग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. हाच आता पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अपप्रचाराला बळी पडू नये. 

जिल्ह्यातील कोरोना काळातील भाजपच्या सेवकार्याची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी नाशिकचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजप सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रविण अलई, संघटन सरचिटणीस प्रा. सुनील बच्छाव, सरचिटणीस नंदकुमार खैरनार, भूषण कासलिवल, प्रशांत जाधव, अमोल पवार, योगेश चौधरी, डॉ प्रशांत गामणे आदी उपस्थित होते 
... 
 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख