विश्वासघाताने सत्तेत आलेले राज्य सरकार टिकणारच नाही - BJP Is Only option. Fraud Govt will not be sustain. BJP Politics. | Politics Marathi News - Sarkarnama

विश्वासघाताने सत्तेत आलेले राज्य सरकार टिकणारच नाही

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 जानेवारी 2021

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेते भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा देऊन सरकारसाठी कौल दिला होता. आजही महाराष्ट्रातील जनता भाजपबरोबर आहे. मात्र विश्वासघात करुन भाजपला एकटे पाडत राज्यात सरकार स्थापन करण्यात आले.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेते भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा देऊन सरकारसाठी कौल दिला होता. आजही महाराष्ट्रातील जनता भाजपबरोबर आहे. मात्र विश्वासघात करुन भाजपला एकटे पाडत राज्यात सरकार स्थापन करण्यात आले. विश्वासघाताने आलेले सरकार टिकणारच नाही. त्यामुळे आपण निवडणुकांसाठी तयार राहिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार राम शिंदे यांनी केले. 

पक्षाच्या बुथ रचनेचा आढावा घेण्यासाठी श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेचा कौल देऊनही जनतेचा विश्‍वासघात करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. परंतु, राज्य सरकार ‘आयसीयू’वर आहे. त्याचे आयुष्य अल्पकालीन आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निवडणुकांसाठी सज्ज राहावे. पक्षाची मजबूत बुथ रचना आगामी निवडणुकीत आपल्याला मोठे यश मिळवून देईल. त्यातून जनतेच्या मनातील भाजपचे सरकार सत्तेत येईल. 

श्री. शिंदे पुढे म्हणाले, की विश्‍वासघाताने तयार झालेल्या महाविकास आघाडीला सडेतोड उत्तर देण्यासाठी पक्षाची बूथ रचना मजबूत करणे गरजेचे आहे. मजबूत बूथ, भाजप मजबूत या संकल्पनेच्या आधारावर कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री. अनासपुरे यांनी बूथ संपर्क अभियान कार्यक्रमाचे स्वरूप सादर केले. ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत बूथ रचना व संपर्क अभियानाच्या बैठका घ्याव्यात, १४ ते २१ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बूथ संपर्क अभियान उभे करून या अभियानात प्रदेशाकडून आलेल्या बूथ संपर्क अभियानासाठी नियोजित उपक्रम उद्दिष्टपूर्ततेकडे नेणे आदी बाबीवर त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी कोविड काळात गरजूंना केलेल्या मदतकार्याचा अहवाल सादर केला. प्रारंभी पंडित दीनदयाळ उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. 

यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, सरचिटणीस नंदकुमार खैरनार, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, प्रदेश सांस्कृतिक आघाडी सहसंयोजक नुपूर सावजी, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे, महिला उद्योग आघाडी प्रदेश सहसंयोजक सोनल दगडे, विशाल जाधव, उमेश घळसासी आदी उपस्थित होते. 
...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख