शासनाकडून निधी आणण्याचे महापौरांचे शिवसेनेला आव्हान

शहरातील नव्याने तयार होत असलेल्या दोन उड्डाणपुलांसह विकासकामांसाठी कर्ज काढण्यास ब्रेक लावणाऱ्या शिवसेनेला भाजपने मंगळवारीप्रस्तावित दोन्ही पुलांना स्थगिती देण्याची मागणी करत दणका दिला आहे.
Satish Kulkarni
Satish Kulkarni

नाशिक : शहरातील नव्याने तयार होत असलेल्या दोन उड्डाणपुलांसह विकासकामांसाठी कर्ज काढण्यास ब्रेक लावणाऱ्या शिवसेनेला भाजपने मंगळवारीप्रस्तावित दोन्ही पुलांना स्थगिती देण्याची मागणी करत दणका दिला आहे. आता राज्य सरकारकडून निधी आणावा, असे आव्हानच महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले आहे.

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी भाजपने शहरात दोन नवीन उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. पहिला पूल मायको सर्कल, तर दुसरा पूल त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकादरम्यान होता. दोन्ही पुलांसाठी साधारण अडीचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असून, महापालिकेच्या निधीतून पूल तयार होणार आहे. पुलांची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेचे श्रेय असल्याचा दावा केला होता.

पुलांच्या श्रेयावरून वाद सुरू असतानाच, प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली होती. पुलांसह विकासकामांसाठी निधीची आवश्‍यकता असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तीनशे कोटींचे कर्ज काढण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परवानगी मागितली होती. हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरू होत असतानाच, शिवसेनेने जोरदार विरोध केला. महासभेच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून कर्ज काढण्यास विरोध दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर भाजपने उड्डाणपुलांसह विकासकामांसाठी निधी नसल्याने पुलांना स्थगिती देण्याची मागणी आयुक्तांकडे मंगळवारी केली. महापौर सतीश कुलकर्णी, भाजप गटनेता जगदीश पाटील, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी आयुक्त जाधव यांची भेट घेऊन महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने दोन्ही उड्डाणपूल स्थगिती करण्याची मागणी करत उड्डाणपुलांसाठी शासनाकडून निधी आणण्याचेही आव्हान देताना शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

सत्ताधारी भाजपही आक्रमक
पुढील वर्षात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली आहे. नाशिक रोडच्या पाणीपुरवठ्याचे निमित्त साधून शिवसेनेने महासभेत केलेला राडा हा त्यातलाच एक भाग मानला जात आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून, पुलांना स्थगिती देण्याची मागणी स्वतःच करून विकासकामांना शिवसेनेकडून होत असलेला विरोध नाशिककरांसमोर मांडला जाणार आहे. निवडणूक प्रचारातही हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनाकडून खोडा : महापौर
महापालिकेच्या निधीतून उड्डाणपूल तयार करण्याचे नियोजन होते. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रशासन हटवादी असून, जाणीवपूर्वक विकासकामांना खोडा घालत असल्याचा आरोप महापौर कुलकर्णी यांनी केला. उड्डाणपुलांसाठी खर्च होणारा निधी नगरसेवकांच्या विकासकामांवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्मार्टसिटी कंपनीकडे महापालिकेच्या हिश्शाच्या अखर्चिक दोनशे कोटींच्या निधीपैकी शंभर कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करून तोही निधी नगरसेवकांच्या विकासकामांवर खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उड्डाणपूल, डीपी रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून अडीचशे कोटींचे कर्ज काढण्यासाठी परवानगीच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे महापौर कुलकर्णी यांनी पत्रातून दिल्या आहेत.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com