नाशिक : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो, हे वारंवार उच्चारले जाणारे सत्य आहे. मात्र शत्रुत्व असलेले एकत्र आले तर?. ते देखील भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनमध्ये आले तर...मग चर्चा होणारच. आज नाशिक शहरातील पत्रकार, कार्यकर्त्यांना हा अनुभव आला. भाजपचे पदाधिकारी आज नुतनीकरण केलेल्या शिवसेना भवनला आले, अन् प्रसाद घेऊन गेले. अर्थात सत्यनारायण पूजेचा प्रसाद घेऊन गेले.
त्याचे असे झाले की, शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी विविध उपक्रम राबविले. त्यात शहरातील शिवसेना भवनचे नुतनीकरण करण्यात आले. त्याचे लोकार्पण आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र श्री. राऊत कार्यक्रमाला तीन तास उशीरा पोहोचले. ते आले तेव्हा तीथे भाजपचे पदाधिकारीही होते. महापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप यांसह विविध नेते होते. राऊत यांच्या कार्यक्रमावेळी भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या कार्यालयात कसे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. पत्रकारांच्या तर भुवया उंचावल्या. मात्र थोड्याच वेळात हे पदाधिकारी तेथून निघून गेले.
श्री. राऊत यांची पत्रकार परिषद सुरु झाल्यावर पत्रकारांनी सर्वात आधी हाच प्रश्न उपस्थित केला. त्यावर राऊत यांनी देखील त्याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यावर भाजपचे हे कार्यकर्ते आले होते. मात्र कार्यालयाच्या नुतनीकरणानिमित्त पूजेसाठी त्यांना निमंत्रीत केले होते. त्यानुसार ते आले आणि प्रसाद घेऊन निघून गेले. अर्थात याचवेळी भाजपच्या पन्नास कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही घटना घडण्यास एकच वेळ पडली. त्यामुळे मात्र त्याची चर्चा बराच वेळ सुरु होती.
यावेळी कार्यालयाचे नुतनीकरण व अंतर्गत सजावट पाहून संजय राऊत यांचा मुड देखील बराच खुलला होता. पदाधिकाऱ्यांना ते म्हणाले, वा, आता कसे प्रसन्न वाटते. शिवसेनेचे आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यालय वाटते. राज्यात आपली सत्ता आहे. महापालिकेत देखील सत्ता येणारच आहे.
...

