BJP leaders rasta roko for Milk producers deemands | Sarkarnama

दूधाला दहा रुपये अनुदानासाठी महायुतीच्या नेत्यांचा रास्ता रोको

संपत देवगिरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्यातील दूध उत्पादकांकडून सहकारी सोसायट्या अत्यंत कमी दरात दूध खरेदी करतात. उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचा विचार करुन राज्य सरकारने दूध उत्पादकांना प्रती लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी आज महायुतीच्या नेत्यांनी शहरालगत रास्ता रोको आंदोलन केले.

नाशिक : राज्यातील दूध उत्पादकांकडून सहकारी सोसायट्या अत्यंत कमी दरात दूध खरेदी करतात. उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचा विचार करुन राज्य सरकारने दूध उत्पादकांना प्रती लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी आज महायुतीच्या नेत्यांनी शहरालगत रास्ता रोको आंदोलन केले.  

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि आर. पी. आय (ए) यांसह रयत क्रांती संघटनेतर्फे आज दूध उत्पादकांच्या प्रश्‍नावर एल्गार आंदोलन करण्यात आले. आज राज्याच्या विविध भागात हे आंदोलन झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी हे आंदोलन झाले. दूधाला सरसकट दहा रुपये प्रती लिटर अनुदान देण्यात यावे, दूधाच्या भुकटीला पन्नास रुपये प्रती किलो अनुदान द्यावे, यांसह विविध प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन झाले. त्यासाठी सकाळी भाजपच्या नेत्यांनी दूधाच्या कॅन घेऊन मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल येथे आंदोलन केले. त्यानंतर येथे रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहूल ढिकले, निफाडचे तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, सचिन बच्छाव, बापू पाटील, योगेश चौधरी, प्रशांत गोसावी, दिपक श्रीखंडे, नितीन जाधव, सुकदेव मोरे, शंकरराव वाघ, परेश वाघ यांसह विविध कार्यकर्ते सहभागी झाले. पोलिसांनी हे आंदोलन होणार असल्याने वाहतूक अन्य लेनने वळवली होती. त्यानंतर या आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. 

महायुतीचे नेते पदाधिका-यांसह आंदोलनासाठी एकत्र आले होते. यावेळी या नेत्यांनी 'गाईच्या दुधाला 10 रुपये, तर दूध भुकटीला प्रतिकिलो 50 रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी राज्यातील मुक्‍या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला दे,' असे आवाहन केले. राज्य सरकारला दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी यापूर्वीच इशारा दिला होता. मात्र त्याबाबत काहीही पावले उचलली नाहीत. सरकार या मागण्यांबाबत गंभीर नाही. अन्यथा त्यांना या प्रश्नांचे गांभिर्य लगेच समजले असते. सरकारचे मंत्री केवळ राजकारण करुन निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र या मागण्या मान्य न झाल्यास राज्याच्या सर्व भागात आंदोलनाचा भडका उडेल. शेतकरी याविषयी अतिशय त्रस्त आहेत. त्यामुळे महायुतीची मागणी तातडीने मान्य करावी असी मागणी यावेळी करण्यात आली. 

सय्यद पिंपरी येथे सिद्धेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब ढिकले, आमदार राहूल ढिकले यांसह दूध उत्पादक सभासदांनी एकत्र येऊन आंदोलन केले. यावेळी त्यांनी दूधाची नासाडी न करता दूध वाटप करुन आंदोलन केले. चाडेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या उपस्थितीत दूध उत्पादकांसह आंदोलन झाले.
...
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख