भाजप सत्ता व पैशांद्वारे विरोधी पक्षांची सरकारे पाडतो आहे - Bjp Disturbs oppisition state goernments with maney and power | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप सत्ता व पैशांद्वारे विरोधी पक्षांची सरकारे पाडतो आहे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 जुलै 2020

आमदारांची खरेदी-विक्री आणि विविध प्रलोभने दाखवून भाजपचे हे नितीहीन राजकारण सुरु आहे. या सर्व प्रकरणांची तटस्थ यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे. हे कृत्य देशातील केंद्र व राज्य सरकारची घटनात्मक चौकट आणि लोकशाहीला मारक आहे. 

नाशिक : भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्ता आणि पैशांचा वापर करुन देशभरातील विरोधी पक्षांची राज्य सरकारे अस्थिर करीत आहे. आमदारांची खरेदी-विक्री आणि विविध प्रलोभने दाखवून भाजपचे हे नितीहीन राजकारण सुरु आहे. या सर्व प्रकरणांची तटस्थ यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे. हे कृत्य देशातील केंद्र व राज्य सरकारची घटनात्मक चौकट आणि लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे घटनात्मक संस्थांकडून त्याला तातडीने अटकाव करावा, अशी मागणी युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आली. 

भाजपच्या या कृत्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. केंद्रातील सरकार आणि भाजप पक्षाकडून सातत्याने देशात लोकशाहीची पायमल्ली सुरु आहे. त्यांच्या विरोधातील राज्य सरकारांविषयी आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेली राज्य सरकारं अस्थिर करणे किंवा घोडेबाजार करून तेथील राजकीय वातावरण दूषित करून ती सरकारं पाडणे असे गलिच्छ व कपटी राजकारण सध्या भाजपतर्फे देशभरात सुरु आहे. कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि आता राजस्थानमध्ये त्यांचा हा प्रयोग सुरु आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची सरसकट हत्याच आहे. या विरोधात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली. सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन हे आंदोलन झाले. 

भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्ता, अनधिकृत पैशांचा गैरवापर करुन विविध राज्यांतील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष लोकशाहीची हत्या करु पहात आहे. त्याला घटनात्मक संस्था व पदांवरील व्यक्तींनी अटकाव करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे याविषयी तातडीने कार्यवाही व्हावी. अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. 
कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, युवक कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, नगरसेवक राहूल दिवे, प्रदेश सरचिटणीस व जिल्हा परिषद सभापती अश्‍विनी आहेर, भास्कर गुंजाळ, दर्शन पाटील, धनंजय कोठुळे, जावेद पठाण, अमित नगरकर, सलमान काझी, रोहन कातकाडे यांसह विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
.... 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख