वाढदिवस नेत्याचा अन्‌ शिवभोजनाचा भार सरकार अन्‌ जनतेला!  - Birthday of leaders and paying of Shivbhojan of Government | Politics Marathi News - Sarkarnama

वाढदिवस नेत्याचा अन्‌ शिवभोजनाचा भार सरकार अन्‌ जनतेला! 

संपत देवगिरे
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

शिवभोजन थाळी राज्य शासनाने जनतेच्या पैशांतून गरीबांसाठी सुरु केलेली योजना आहे. मात्र अनेक राजकीय नेते शहर व जिल्ह्यात आपला वाढदिवस शिवभोजन थाळी वाटपाच्या इव्हेंटने करु लागले आहेत. "चमकोगिरी'ची हौस भागविणारे हे नेते शिवभोजन थाळी वाटतात खरी, मात्र यामध्ये थाळीचा खर्च पाच रुपये अन्‌ सरकारचे अनुदान अर्थात जनतेचा करातील पैसा पंचेचाळीस रुपये अशी स्थिती आहे.

नाशिक : शिवभोजन थाळी राज्य शासनाने जनतेच्या पैशांतून गरीबांसाठी सुरु केलेली योजना आहे. मात्र अनेक राजकीय नेते शहर व जिल्ह्यात आपला वाढदिवस शिवभोजन थाळी वाटपाच्या इव्हेंटने करु लागले आहेत. "चमकोगिरी'ची हौस भागविणारे हे नेते शिवभोजन थाळी वाटतात खरी, मात्र यामध्ये थाळीचा खर्च पाच रुपये अन्‌ सरकारचे अनुदान अर्थात जनतेचा करातील पैसा पंचेचाळीस रुपये अशी स्थिती आहे.

त्यामुळे नेते आपला वाढदिवस शासनाच्या खर्चातून साजरे करु लागल्याचा ट्रेंड गेले काही दिवस सुरु झाल्याचे चित्र बदलण्यासाठी कोण पुढाकार घेईल, अशी विचारणा होत आहे. 

गेले काही दिवस विविध स्वयंघोषीत नेत्यांचे वाढदिवस साजरा करण्याचा शहरात एक पॅटर्न बनला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, अर्थात यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची संख्या कणभर जास्तच भरेल अशी आहे. हे नेते आपल्या वाढदिवसाला शिवभोजन थाळी केंद्रावर जाऊन समर्थकांसह शिवभोजन वाटपाची छायाचित्रे काढतात. त्यासाठी हार-गुच्छ यांपासून तर सत्काराचे साग्रसंगीत कार्यक्रम केले जातात. त्याची छायाचित्र माध्यमांपासून तर सोशल मिडीयावर जोरकसपणे व्हायरल केले जातात. एरव्ही लाखोंच्या गाडीत मिरवून चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये विशेष भरणा आहे. हा कार्यक्रम करतांना ज्यांच्यासाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे, त्यांना मात्र सिवभोजन थाळी केंद्रावर नेत्यांचे पोटोसेशन होईपर्यंत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे हे उपाशी लाभार्थी या नेत्यांना काय "आर्शिवाद' अन्‌ "सदिच्छा' देत असतील "हे सांगने न लगे.' 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अन्‌ विशेषतः शिवसेनेने महत्वाकांक्षी योजना म्हणून गरीबांना दहा रुपयांत भोजन मिळावे म्हणून शिवभोजन थाळी ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यात दोन पोळ्या, सुकी भाजी, डाळ आणि भात दिला जातो. सामान्य व्यक्तीचे किमान पोट भरेल असे त्याचे नियोजन आहे. शहरात अनेक निराधार, बेरोजगार व गरीब प्रवासी या थाळीचा लाभ घेतात. त्यात लाभार्थीकडून दहा रुपये घेण्यात येतात. चाळीस रुपये राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. सध्या कोरोनाची महामारी असल्याने दहा रुपयांएैवजी त्याचे मुल्य पाच रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे पंचेचाळीस रुपये शासनाच्या तिजोरीतून अर्थात जनतेच्या पैशांतून अनुदन स्वरुपात दिले जातात.

नेते मंडळी आपल्या वाढदिवसाला या थाळी वाटपाचा इव्हेंट करुन काय साध्य करतात? हा खरा प्रश्‍न आहे. या सर्व प्रकारात वाढदिवस नेत्याचा, हाल उपाशी गरीबांचे अन्‌ झळ राज्य सरकारला अर्थात जनतेला अशी स्थिती आहे. नेत्यांच्या या चमकोगिरीत शिवभोजन थाळीचा मुळ उद्देशच हरवून जातो की काय अशी स्थितीत निर्माण झाली आहे. त्यावर सध्या तरी कोणाचेच नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे हे प्रकार थांबतील का? असा प्रश्‍न राजकीय कार्यकर्ते, नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. 
... 
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख