अबु आझमी यांचे सरकारला आवाहन..रमजानमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करा.. - Being a minority city Malegaon should not be neglected Abu Azmi | Politics Marathi News - Sarkarnama

अबु आझमी यांचे सरकारला आवाहन..रमजानमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

रमजानच्या पार्श्र्वभूमीवर व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन  अबु असीम आझमी यांनी येथे केले. 

मालेगाव :  शहरासह, राज्यातील कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात. अल्पसंख्याकांचे शहर असल्याने मालेगावकडे दुर्लक्ष नको. अंशतः निर्बंधांमुळे लहान व्यवसाय डबघाईस जातील. सरकारने निर्बंध शिथिल करून रमजानच्या पार्श्र्वभूमीवर व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबु असीम आझमी यांनी येथे केले. 

दोंडाईचा येथील दौरा करून मुंबईला परत जात असताना त्यांनी येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आझमी यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष (पै.) जैनुद्दीन मन्सुरी यांच्या निधनामुळे लढवय्या कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली. त्यांचे बंधू अध्यक्ष शरीफ मन्सुरी यांच्याकडे त्यांनी शोकसंदेश दिला. गेल्यावर्षी कोरोनाने त्यांचा बळी घेतला होता. मन्सुरी पूर्व भागात सातत्याने पोलिस व सामान्य नागरिकांना मदत करीत होते. 

आझमी यांनी यंत्रमाग कृती समितीचे अध्यक्ष युसुफ इलियास यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आगामी काळात ते समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेऊन येथील परिस्थिती समजून घेतली.  रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात. येथील सामान्य रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख