सावध रहा; कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे नियोजन करावे! - Be Aware, prepare for covid-19 second flow | Politics Marathi News - Sarkarnama

सावध रहा; कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे नियोजन करावे!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या को-मॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांना आवश्यकता भासल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे. पोस्ट कोविड ओपीडी कार्यान्वित करावी. असे निर्देश विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

नाशिक : युरोपातील अनेक देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन घोषित करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. 

आयुक्त  गमे बुधवारी धुळे दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना अभिनंदनीय आहेत. असे असले तरी गाफिल राहून चालणार नाही. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून अधिक बेडचे आतापासूनच नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवितानाच त्यांच्यात सातत्य ठेवावे. कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करावी. त्याबरोबर रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. 

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या को-मॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांना आवश्यकता भासल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे. पोस्ट कोविड ओपीडी कार्यान्वित करावी. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी. त्यांच्याकडून दंड वसूल करावा. विक्रेत्यांनाही विना मास्क येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश देवू नये. तशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांनी विक्रेत्यांना द्याव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. मृत्यू दरही कमी झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात १०० बेड तयार करण्यात आला आहे. त्याचा लाभ रुग्णांना होणार आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच नॉन कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक कार्यान्वित केला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे सांगितले. 

यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महापालिका आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक माणिक भोसले, उपायुक्त अर्जुन चिखले (रोहयो), अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल उपस्थित होते.
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख