आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश अजित पवारांच्या किती फायद्याचा? - Asif Shaikh NCP entry will benificial to Ajit Pawar Or Shaikh | Politics Marathi News - Sarkarnama

आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी प्रवेश अजित पवारांच्या किती फायद्याचा?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यासाठी त्यांनी कारण दिले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याशी चर्चेला भरपुर वेळ दिला. प्रत्यक्षात मात्र खरे कारण मालेगावात आपल्याला नवा प्रतिस्पर्धी तयार होऊ नये यासाठीच्या व्युहरचनेचा हा भाग असल्याचे बोलले जाते. 

मालेगाव : माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यासाठी त्यांनी कारण दिले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याशी चर्चेला भरपुर वेळ दिला. प्रत्यक्षात मात्र खरे कारण मालेगावात आपल्याला नवा प्रतिस्पर्धी तयार होऊ नये यासाठीच्या व्युहरचनेचा हा भाग असल्याचे बोलले जाते. 

आसिफ शेख हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा एमआयएमचे मौलाना मुफ्ती यांनी पराभव केला होता. आसिफ यांचे वडील माजी आमदार रशीद शेख यांचे घराणे एक अपवाद वगळता गेली पाच दशके काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्यातून त्यांना काँग्रेसने अनेक महत्वाची पदे व सत्ता दिली. विद्यमान महापौर या आसिफ यांच्या आई आहेत. त्यांचे वडील देखील माजी महापौर व माजी आमदार आहेत. काँग्रेसची सगळी सत्ता आसिफ यांच्याच घरात आहेत. असे असतांना काँग्रेसकडून आपल्याला वेळ दिला गेला नाही हे लटके कारण तर नाही? अशी चर्चा स्वाभाविक आहे. 

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महापालिकेच्या कामकाजानिमित्त शेख पिता-पुत्रांचे मुंबई येथे जाणे झाले. मुंबई येथील भेटीत काँग्रेसच्या मंत्र्यांपेक्षा विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळ व सकारात्मक प्रतिसाद दिला. या गुगलीनेच आसिफ चितपट झाले. यातूनच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने सुरू झाली आहे.

या सर्व राजकीय घडामोडींना एक छुपा संदर्भ आहे. `एमआयएम`चे मौलाना हे काँग्रेस व शेख कुटुंबियांचे प्रतिस्पर्धी आहेत. नुकतेच त्यांच्या विरोधात म्यानमारच्या संशयास्पद इक्बाल कनेक्शनमुळे चर्चेत आहेत. या प्रकरणात राज्य सरकारने मौलाना मुफ्ती यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. ही आसिफ शेख यांची खंत आहे.  विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हवे तसे पाठबळ श्री. शेख यांच्या पाठिशी उभे केले नाही. प्रचाराला राज्य व राष्ट्रीय नेता फिरकला नाही. त्याचेही शल्य आसिफ शेख यांना होते. या सर्व राजकीय घडामोडींत मालेगावचे राजकारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या तीन पक्षांभोवती फिरते. आसिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यास शेख कुटुंबीयांचा एक विरोधक कमी होईल. त्यात त्यांचा राजकीय फायदाच आहे. त्यामुळे खरच अजित पवार यांनी चुचकारल्याने आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्ष सोडला की शेख कुटुंबियांनीच आपल्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला चुचकारले याचे उत्तर भविष्यातच मिळेल. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख