कोरोनावर असाही उतारा...आश्रमशाळाच पोहोचली विद्यार्थ्याच्या दारी - Ashram school at students doorstep at Nandgaon, Chalisgaon | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनावर असाही उतारा...आश्रमशाळाच पोहोचली विद्यार्थ्याच्या दारी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

नांदगावच्या काही शिक्षकांनी त्यावर देखील तोडगा शोधला आहे. शाळा बंद असल्या म्हणून काय़, हे शिक्षक वस्त्यांत जाऊन शाळा भरवत आहेत. मुलांना हसत खेळत शिक्षण देत आहे. हा प्रयोग चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. 

नाशिक : कोरोना, लॅाकडाऊन आणि बंद हे तीनच शब्द सध्या सगळ्यांच्या कानी पडतात. त्यात शाळा आणि शिक्षण जणू आहे तसे स्थितप्रज्ञ झाले आहे. शहरी भागात डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र जीथे अक्षरगंधच, मोबाईल मिळतच नाही नाही, त्यांचे काय?. नांदगावच्या काही शिक्षकांनी त्यावर देखील तोडगा शोधला आहे. शाळा बंद असल्या म्हणून काय़, हे शिक्षक वस्त्यांत जाऊन शाळा भरवत आहेत. मुलांना हसत खेळत शिक्षण देत आहे. हा प्रयोग चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. 

न्यायडोंगरी (ता. नांदगाव) येथील श्री.शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित, स्व. गंगाधर तथा आण्णासाहेब शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेने हा प्रयोग सुरु केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर आणि कॅाग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या या भागातील वस्त्यांत रोज सकाळी ही शाळा भरते. त्यात मुलेही आंनंदाने त्यात सहभागी होतात. मुलांची शाळा पाहून हातावर पोट असलेले पालकही त्यात रस घेऊ लागले आहेत.   

या संस्थेतील शिक्षक कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर `शाळा बंद पण शिक्षण चालू`  या शासनाच्या धोरणानुसार मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत आजपर्यंत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गाचा व्हाट्सअॅपचा ग्रुप तयार करुन दररोजचा अभ्यास घेण्यास सुरवात केली होती. परंतू सर्व पालकांकडे एंड्रॉइड मोबाईल नसल्याने आश्रमशाळा आपल्या दारी या उपक्रमाचा प्रस्ताव पुढे आला. या नियोजनात संस्थेचे सरचिटणीस माजी आमदार आहेर  यांनी त्यांना मदत केली. 

या शाळेतील विद्यार्थी असलेल्या पिंपरखेड, पिंप्री (नांदगाव) हातगाव, तळेगाव, तळोंदे (चाळीसगाव) येथील आदिवासी वस्तीत जाऊन सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्याना शिकविले जाते. या सर्वांना विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे जोपर्यंत शाळेत विद्यार्थी येणार नाहीत, तोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देणार, असा आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांनी निश्चय केला आहे. या निर्णयाचे व उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख