गावात पाणीच नाही, त्या दत्तू भोकनळला पाणीदार खेळाने दिला अर्जुन पुरस्कार  - Arjun Award to Dattu Bhoknal in Water game roing | Politics Marathi News - Sarkarnama

गावात पाणीच नाही, त्या दत्तू भोकनळला पाणीदार खेळाने दिला अर्जुन पुरस्कार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

क्रीडा क्षेत्राशी निगडित विविध पुरस्‍कारांची घोषणा शुक्रवारी झाली. त्यात नाशिकच्‍या आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याला अर्जुन पुरस्‍कार जाहीर झाला. त्यामुळे नाशिकच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नाशिक :  क्रीडा क्षेत्राशी निगडित विविध पुरस्‍कारांची घोषणा शुक्रवारी झाली. त्यात नाशिकच्‍या आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याला अर्जुन पुरस्‍कार जाहीर झाला. त्यामुळे नाशिकच्या क्रिडा क्षेत्राचा सन्मान झाला आहे. यानिमित्ताने मोलमजुरी करीत सैन्यात दाखल होऊन रोईंगमध्ये पदकाची कमाई करीत अर्जुन पुरस्काराला त्याने गवसनी घातली. तो म्हणाला, मी आजवर घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. सरकारने माझी दखल घेतली.

दत्तू मूळचा तळेगाव रोही (चांदवड) या दुष्काळी भागातील आहे. या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. कोरडवाहू शेती. तेथील दत्तूने पाण्याशी संबंधीत असलेल्या रोईग या खेळात प्राविण्य प्राप्त केले, हे विशेष. गावाच्‍या मातीशी नाळ जुळलेल्या रोइंगपटू दत्तू भोकनळने लष्करी सेवेतून सुट्यांमध्ये गावी आल्‍यानंतर वडिलोपार्जित जिरायत शेतीत मक्‍याची सोंगणी केली. आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेला असताना कुठलीही लाज न बाळगता शेतीत घाम गाळताना दत्तूने कामात आपल्‍या कुटुंबीयांना हातभार लावला. हलाखीच्‍या परिस्‍थितीतून पुढे येत दत्तूने आंतरराष्ट्रीय स्‍तरावर छाप सोडली आहे. सध्या तो लष्करात कार्यरत आहे. या पुरस्काराने क्रीडाप्रेमींमध्ये आनंद आहे. ऑलिंपिकपटू कविता राऊत-तुंगारनंतर अर्जुन पुरस्‍काराला गवसणी घालणारा दत्तू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

अत्‍यंत सामान्‍य कुटुंबातील भोकनळ याने प्रतिकूल परिस्‍थितीतून आजवरचा प्रवास केला आहे. त्याचे वडील विहीर खोदण्याचे काम करायचे. शालेय शिक्षणापासूनच कष्ट केलेल्‍या दत्तूचा प्रवास संघर्षमयी राहिला आहे. कुटुंबासमोरील अडचणींचा साक्षीदार राहिलेला दत्तू २०१२ मध्ये सैन्‍यदलात भरती झाला. लष्करात दाखल होईपर्यंत दत्तूला रोइंग खेळाविषयी माहिती नव्‍हती. सुभेदार कुदरत यांनी दत्तूची शरीरयष्टी बघून खेळाची गोडी लावली. २०१४ मध्ये पुण्यात झालेल्‍या राष्ट्रीय स्‍पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविली. पुढे ऑलिंपिक पर्यंत त्याने धडक दिली. राज्‍य शासनाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्‍कार असलेल्‍या शिवछत्रपती पुरस्‍काराने दत्तूचा २०१७ मध्ये गौरव करण्यात आला आहे. 

पुरस्कार जाहीर झाल्यावर दत्तू भोकनळ म्हणाला, रोइंग खेळातील माझ्या योगदानाची दखल घेतली. आजवर घेतलेल्‍या कष्टाचे चीज झाले. कमी पाण्याचे गाव म्‍हणून ओळख असलेल्‍या चांदवड तालुक्‍याचे प्रतिनिधित्‍व करताना, रोइंग खेळात चांगली कामगिरी करता आली, याचे मनस्‍वी समाधान आहे. यापुढेदेखील २०२१ मध्ये ऑलिंपिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे स्‍वप्‍न आहे. 
... 
छगन भुजबळांकडून अभिनंदन
दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्‍याबद्दल त्‍याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्‍य शासनाच्या वतीने अभिनंदन केले आहे. दत्तूचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. मोलमजुरी करत शिक्षण घेतले.  यातून नवखेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल. नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख