Amruta Pawar Deemands Sanction for Antingen test kit to Niphad | Sarkarnama

अमृता पवार म्हणाल्या, अँटींजेन टेस्ट किटसाठी निफाडला निधी हवा ! 

संपत देवगिरे
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांच्या तपासण्यांसाठी अँटींजन टेस्ट किट खरेदीसाठी राज्य शासनाने तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्या आर्कीटेक्‍ट अमृता पवार यांनी केली.

नाशिक : निफाड तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आता तालुक्‍यातील जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात सर्व सदस्यांनी एकत्र येऊन नागरिकांत कोरोनाविषयी जागरुकता व प्रबोधन करण्याची मोहिम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांच्या तपासण्यांसाठी अँटींजन टेस्ट किट खरेदीसाठी राज्य शासनाने तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्या आर्कीटेक्‍ट अमृता पवार यांनी यावेळी केली. 

निफाड हा नाशिक शहरालगतचा तालुका आहे. या तालुक्‍यात पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सायखेडा, निफाड यांसह विविध मोठ्या बाजारपेठा आहेत. तेथे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी नेतात. ओझर हे मोठे गाव वजा शहर आहे. त्यामुळे या तालुक्‍यात कोरोना नियंत्रणात ठेऊन, सबंध तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत निफाड तालुक्‍यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ओझर येथे मोठ्या संख्येने एचएएल प्रकल्पात कामगार येतात. त्यांची ने आण करण्यासाठी बसेसची संख्या वाढवावी. प्रत्येक गावात सोशल मिडीयाचा उपयोग करुन कोरोनाच्या प्रसाराच्या माहितीची देवान घेवान करावी. लोकांना कोरोनापासून बचावासाठी काय काय करायचे, कोणते उपाय करावेत, औषधोपचार काय आहेत, उपचाराच्या सुविधा कुठे आहेत, कोणाशी संपर्क करावा याबाबत प्रबोधनावर भर दिला जाव. सर्वच सदस्यांनी याविषयी आपल्या गटात नागरिकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. त्याचा विस्तार करण्याचे ठरले. 

आज जाहिर झालेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माहितीनुसार निफाड तालुक्‍यात 202 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अमृता पवार यांच्या देवगाव गटात सध्या दोन कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. एक रुग्ण उपचारानंतर बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. एकाचे निधन झाले आहे. मात्र निफाड हा दिंडोरी, सिन्नर व नाशिक या तीन तालुक्‍यांना जोडलेला तालुका आहे. येथे कृषी अर्थव्यवस्था बळकट असल्याने नागरिकांचा सर्व भागात वावर असतो. त्यादृष्टीने भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या शासकीय यंत्रणेकडे साधनांची कमतरता आहे. नागरिकांच्या चाचण्यांसाठी अँटींजन किट उपलब्ध करण्याची मागणी या बैठकीत आर्कीटेक्‍ट पवार यांनी केली. मात्र सध्या त्यासाठी राज्य शासनाकडून निधी आलेला नाही. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाल्यावर त्यात यासंदर्भात तरतुद करण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, यतीन कदम, दिपक शिरसाठ, सुरेश नाना कळमकर आदी निफाडचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. 
... 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख